निवेदन सादर : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणीचंद्रपूर : जिल्ह परिषदेमधील ३० जून २०१४ रोजी झालेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या समुपदेशनानुसार समायोजनात शिक्षण विभागाच्या चुकीमुळे महिला मुख्याध्यापिकेवर अन्याय झाल्याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करून दोषींविरूद्ध कार्यवाही करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी केली आहे. शिष्टमंडळात राजू लांजेवार, सरचिटणीस उपस्थित होते.पंचायत समिती अंतर्गत कार्यरत उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पंचायत समिती निहाय रुजू तारखेनुसार पात्र-अपात्र यादी प्रकाशित करण्यात आली. यादी उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रकाशित झाल्यामुळे उच्चश्रेणी मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागावर विश्वास ठेवून रुजु तारखेची पडताळणी केली नाही. पंचायत समितीमधील शिक्षण विभागात उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे सेवा पुस्तके उपलब्ध असल्यामुळे त्यामधील रुजू तारीख नोंदीनुसार प्रकाशित यादीत रुजु तारीख प्रकाशित करणे आवश्यक होते.परंतु शिक्षण विभागाच्या सदोष कार्यपद्धतीमुळे पंचायत समितीमध्ये २९ जून २०१२ ला रुजू झालेल्या मुख्याध्यापिकेला १६ मे २००५ ला दाखवून दोन वर्ष झालेला सेवाकाळ ९ वर्षे दर्शविण्यात ाला. त्यामुळे संबंधित उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे समुपदेशनानुसार समायोजन त्याच पंचायत समितीमध्ये न होता ११० कि.मी. अंतरावरील शाळेत करण्यात आले. त्यामुळे उच्चश्रेणी मुख्याध्यापकावर अन्याय झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने म्हटले आहे.शिक्षण विभागाने महिला मुख्याध्यापिकेवर जााणूनबुजून अन्याय केल्याचे परिषदेने म्हटले आहे. चुकीच्या तारखेमुळे महिला मुख्याध्यापिकेवर समुपदेशन प्रक्रियेत अन्याय करण्यात आला. कार्यालयात सेवापुस्तिकेत रुजू तारखेच्या स्पष्ट नोंदी असताना सुद्धा प्रकाशित यादीत चुकीची रुजू तारीख दाखवून मानसिक त्रास देणे सुरू आहे.यापुर्वीसुद्धा संबंधित पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सदोष कार्यपद्धतीमुळे अनेक शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. वारंवार शिक्षकांच्या विनाकारण मानसिक त्रास देणारे प्रकार घडणे बंद होणे आवश्यक असल्याचे प्राथमिक शिक्षक परिषदेने म्हटले असून पंचायत समितीच्या सदोष कार्यपद्धतीवर जिल्हा परिषदेने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासन या संदर्भात अन्यायग्रस्त मुख्याध्यापिकेबाबत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)
मुख्याध्यापिकेवरील अन्याय दूर करा
By admin | Updated: July 23, 2014 23:32 IST