चंद्रपूर : छत्रपती शाहू महाराजांनी समाजाला शांती, मदतीची भावना आणि एकतेचा संदेश दिला. त्यांचा जन्म दिवस साजरा करताना त्यांचे विचारही अंगिकारा आणि त्याप्रमाणे समाजात ते दृढ करण्याचे प्रयत्न करा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर येथील सामाजिक न्याय भवनात रविवारी आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ. नाना शामकुळे, समाजकल्याणचे उपायुक्त दिलीप राठोड, सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात समाजाला न्याय देण्याची भूमिका स्वीकारली. शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. शाहू महाराजांनी त्यांच्या काळातच वृक्षाचे महत्त्व समाजास समजावून सांगितले होते. समाजात शांती नांदावी, मदतीची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांचे विचार अंगिकारल्यास खऱ्या अथार्ने आदरांजली ठरेल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
शाहू महाराजांचे स्मरण करीत त्यांचे विचारही अंगिकारा
By admin | Updated: June 27, 2016 00:59 IST