पॅचेसचे काम निकृष्ट : कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणीआक्सापूर : गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग-२ अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे बुजविण्याची कामे सुरू आहेत. मात्र कामाचा दर्जा पाहता महिना उलटण्याच्या आतच त्या ठिकाणी गिट्टी उखडून खड्डे पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी डांबराऐवजी केवल मुरुमाचा वापर करून खड्डे बुजविल्या जात असून खड्डे बुजविण्याच्या कामात कंत्राटदाराने चांगलाच मलिदा लाटल्याचा आरोप केला जात आहे.गोंडपिपरी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. सुरू असलेल्या कामातही तोच प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक दोन गोंडपिपरीअंतर्गत चालू वर्षांत रस्त्याचे नुतनीकरण व डागडुजीची कामे, पॅचेस भरण्याची कामे करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे त्याचप्रमाणे त्याच जुन्याच खड्ड्यावर मलम लावण्याचे काम सुरू असून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. खड्डे पडलेल्या मार्गामध्ये गोंडपिपरी-आष्टी, गोंडपिपरी-आक्सापूर कोठारी, कोठारी-तोहोगाव, गोंडपिपरी-धाबा, गोंडपिपरी-खेडी मार्ग, गोंडपिपरी-विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी, लाठी-वेडगाव आदी मार्गाचा समावेश असून या मार्गाची अगोदरच दैनावस्था असून पुन्हा त्याच रस्त्यावर थातूर-मातूर कामे करण्याचा विकास योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रस्ते नूतनीकरण या डागडुजीच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. सहा महिन्यांच्या आतच रस्ते उखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे पितळ उघडे पडले आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन नेहमीच वादग्रस्त असणारे उपविभागातील अभियंते पुन्हा त्याच पद्धतीने कामे करवून घेत आहेत. गत पाच वर्षात तत्कालीन आमदाराच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणून विकास कामांना मंजुरी मिळवून दिली होती. याचा गैरफायदा घेत येथील अधिकारी व अभियंत्यानी कंत्राटदारांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाची कामे केली, असा आरोपही नागरिकांकडून झाला. यंदा मार्च अखेरपर्यंत तेरावा वित्त आयोग व अन्य विकास निधीची कामे तातडीने आटोपून निधीचा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामाच्या ठिकाणावर अभियंत्याच्या गैरहजेरीत खड्डे न करताच कंत्राटदार फक्त गिट्टी टाकून थातूरमातूर वरवर डांबराचा शिडकावा देवून त्यावर चुरी मारली जात आहे. (वार्ताहर)
रस्ते बुजविण्याच्या कामात घोळ
By admin | Updated: December 16, 2015 01:32 IST