भाविकांची उपस्थिती : १२ वर्षांतून येणारी वैशिष्ट्यपूर्ण गोदायात्रानंदोरी : येथे अनेक सण व उत्सवांच्या परंपरेसोबतच पाटाळा नदी तीरावर १२ वर्षांनी भरणारी गोदायात्रा प्रचलित आहे. यंदा ही यात्रा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडली. नंदोरीतून रथयात्रा काढण्यात आली.नंदोरी गावात पवनशेष, गोविंदशेष, इंद्रशेष ही नागदेवतेची ठाणे तसेच ठेंगणे कुटुंबातील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरसुद्धा आहे. दोन शतकांच्या पूर्वीपासून पाटाळा येथे भरणाऱ्या गोदायात्रेकरिता गावातून रथयात्रा निघत असल्याचे वयोवृद्ध सांगतात. १२ वर्षांपर्यंत उत्कंठेने या गोदायात्रेची लोक वाट पाहतात.पूजाअर्चा, मंगळमाथन, मूंडा स्थापन, हळद लावणे, सुवासिनींना बांगड्या भरणे असे विवाहात करावे लागणारे सर्व विधी सोपस्कर यावेळी पार पाडण्यात येते. सजविलेल्या रथात कुळातील दैवतांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. तसेच एकरे कुटूंबातील प्रभाकर एकरे व त्यांच्या पत्नी मालती एकरे या पती-पत्नीच्या जोडीला बसविण्यात आले होते. ठेंगणे कुटुंबातील रथावर गजानन ठेंगणे व त्यांची पत्नी कौशल्या ठेंगणे यांना बसविण्यात आले होते. चामाटे कुटुंबाच्या रथावर मात्र दैवतांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. सजविलेल्या रथातून त्याच कुटुंबातील पती-पत्नीची विराजमान जोडी यांची शोभायात्रा काढण्यात आली. भक्तांच्या अंगातील वार आणि सजविलेल्या बैलांवरील नृत्य इत्यादींनी मिरवणुकीत भर घातली होती. रथात बसलेल्या जोड्यांना आप्तेष्ठ व कुटुंबीय अश्रुपूर्ण डोळ्यांनी यात्रेला जाणाऱ्या पती-पत्नीच्या जोडीस निरोप देत होते. बारा वर्षातून फक्त एकदाच गोदा येते व रथात बसणाऱ्या जोडीपैकी कोणाचा तरी १२ वर्षांपर्यंत मृत्यू होतो, अशी या गोदारथ यात्रेची आख्यायिका आहे. त्यामुळे कदाचित आपल्यापैकी या जगात कोणीतरी नसणार ही हूरहूर मनाला लावून जात असते. मोहन ठेंगणे यांच्याकडे २०० वर्षांपासून हा रथ असल्याचे त्यांच्या पूर्वजांनी सांगितले, असे सांगण्यात येते. १९५६ साली एकरे, ठेंगणे यांचे नायगावहून व चटप कुटुंबातून मेंढोलीहून पूर्वी रथ येत असल्याचे रथात विराजमान झालेले प्रभाकरराव एकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.(वार्ताहर)
नंदोरीतून निघाली रथयात्रा
By admin | Updated: May 16, 2016 01:06 IST