चंद्रपूर : चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुश नळे व चंद्रपूर मंडलाचे अधीक्षक अभियंता हरिश गजबे यांच्या नेतृत्त्वात वीज बचतीसंदर्भात आज शनिवारी रॅली काढण्यात आली. यात विजेची बचत करा, असा संदेश देण्यात आला.महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलातील विविध कार्यालयात १४ ते २० डिसेंबरदरम्यान ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. चंद्रपूर परिमंडलातील चंद्रपूर विभाग, वरोरा विभाग, बल्लारशाह विभाग तसेच गडचिरोली मंडलातील आलापल्ली, गडचिरोली व ब्रह्मपुरी या विभागातही हा सप्ताह पाळण्यात येत आहे. रॅलीत अधीक्षक अभियंता ए.एस. घोगरे, कार्यकारी अभियंता नितीन चोपडे, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार तसेच चंद्रपूर, बल्लारशाह व वरोरा विभागातील उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही रॅली महावितरणच्या बाबुपेठ येथील परिमंडळ कार्यालयातून निघून महाकाली मंदिर, गिरणार चौक, गांधी चौक अशी जटपुरा गेट वळसा घालून कस्तुरबा रोडने परत बाबुपेठ येथील परिमंडळ कार्यालयात विसर्जित झाली. यावेळी परत एकदा ऊर्जाबचतीची प्रतिज्ञा घेण्यात आली.विजेच्या बचतीचे महत्त्व विषद करताना मुख्य अभियंता अंकुश नाळे यानी रॅलीत सहभागी झालेल्यांना व सर्वांना, वीज बचतीचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. वीज बचत केल्याने बहुमूल्य अशा कोळसा, पाणी या नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास टाळणे शक्य होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
महावितरणद्वारा वीज बचतीचा संदेश देण्यासाठी रॅली
By admin | Updated: December 21, 2015 01:09 IST