राजुरा (चंद्रपूर) : राजुरा शहरात भेसळ करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दुधात पाणी निघाले तर नवल नाही. परंतु पेट्रोलमध्ये चक्क पाणी निघाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. धोपटाळा येथील युवक नरसिंग कुमार याने राजुरा येथील एका पेट्रोलपंपावरून त्याच्या वाहनात १५ लिटर पेट्रोल भरले. त्यानंतर तो वाहनासह पुढे निघाला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर वाहन अचानक बंद पडले. वाहन दुरूस्ती करणाऱ्याला बोलावले असता, त्याने सर्वप्रथम पेट्रोल तपासले असता, पेट्रोलमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आढळून आले. याबाबत पेट्रोलपंपावर जाऊन विचारणा केली असता, तुम्हीच पेट्रोलमध्ये पाणी टाकले असले, असा आरोप पेट्रालपंपचालकाने केला. त्यामुळे हतबल झालेल्या नरसिंग कुमार याने याबाबत शनिवारी पोलिसांकडे तक्रार केली. नरसिंग कुमारला विचारणा केली असता, पेट्रोलमधून सत्तर टक्के पाणी निघाल्याचे त्याने ‘लोकमत’ ला सांगितले. पेट्रोलमध्ये पाणी टाकुन विकण्याचा हा पहिलाच प्रकार राजुरा शहरात उघडकीस आला असुन याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. केवळ याच पेट्रोलपंपावर नाही, तर परिसरातील अनेक पेट्रोलपंपावर मिटरद्वारे ग्राहकांची लुट केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी मात्र प्रशासकीय पातळीवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ग्राहकांच्या खिशाला चुना लागत आहे. संपूर्ण जिल्हाभरच हा प्रकार सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)
राजुराच्या पेट्रोलपंपावर पेट्रोलमधून निघते चक्क पाणी
By admin | Updated: September 11, 2014 23:24 IST