राजुरा : राजुरा येथील शिवाजी कॉलेजजवळ असलेल्या सिमेंट कंपन्यांना कच्चा माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेमुळे दररोज दहा वेळा रेल्वे फाटक बंद केले जाते. एक महिन्यात तीनशे वेळा गेट बंद होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या भागात शाळा, महाविद्यालयांत चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बस डेपो आहे. तेलंगणाकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे रेल्वे फाटकावर मोठी गर्दी होते. मागील अनेक वर्षांपासून अंडर पासची मागणी आहे. माजी खासदार हंसराज अहीर यांनी मंजूर केले होते. परंतु मागील २० वर्षांपासून हे रेल्वे फाटक नागरिकांना त्रास देत आहे. सुबाभूळ भरलेले ट्रक या फाटकामधून जाताना अडकून लाकडे खाली पडतात. यामुळे कुणाला गंभीर दुखापत होऊ शकते, यासाठी वेळेच्या आत दखल घेणे आवश्यक आहे. राजुरा रेल्वे फाटकावर ओव्हर ब्रिज बनवावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी केली आहे.