नाशिक : नऊ दिवसांचा कालावधी अन् ४८०० किलोमीटरची सातत्यपूर्ण सायकल स्पर्धा. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कधी अत्यंत उष्ण, कधी अत्यंत थंड, तर कधी वादळी वारा अन् पाऊस, डोंगरदऱ्यांमधून जाणारा मार्ग, तीव्र चढ आणि तीव्र उतार अशा नैसर्गिक, भौगोलिक परिस्थितीचा सामना करत मोठ्या जिद्दीने नाशिकचे भूलतज्ज्ञ डॉ. हितेंद्र महाजन, दंतरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र महाजन या बंधूंनी भारतीय प्रमाण वेळेनुसार आठ दिवस अन् १४ तासांत रेस अॅक्रॉस (रॅम) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत देशाचा तिरंगा फडकविला. ‘टुर द फ्रान्स’ या सायकल रेस स्पर्धेपेक्षाही अत्यंत खडतर व अवघड समजली जाणारी ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ ही स्पर्धा गेल्या २० जूनपासून अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातून सुरू झाली होती. ही स्पर्धा २९ जून रोजी संपली. स्पर्धेमध्ये सहभागी सायकलस्वारांना नऊ दिवसांमध्ये सुमारे चार हजार आठशे किलोमीटर अंतर कापण्याचे आव्हान होते. सायकलपटू महाजनबंधूंनी आत्मविश्वास, जिद्द व कठोर परिश्रम अन् सरावाच्या जोरावर यशस्वीपणे स्पर्धा पूर्ण केली.
रेस अॅक्रॉस (रॅम) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण
By admin | Updated: June 30, 2015 01:40 IST