शासनाचे दुर्लक्ष : १० वर्षांपासून प्रस्ताव धूळ खातसिंदेवाही : पोलीस हा जनतेचा मित्र असतो. त्याला दिवसरात्र कर्तव्यावर डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. त्याला आपल्या हक्काचे घर मिळणे गरजेचे आहे. परंतु सिंदेवाही येथील पोलिसांची निवासस्थाने अतिशय अल्प संख्येत असल्याने काही पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर भाडे तत्वावर घर घेवून राहावे लागत आहे. त्यातून त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी १० वर्षांपूर्वी बांधकाम विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु तो अद्यापही धूळ खात पडून असल्याने येथील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या रक्षणासाठी सातत्याने झटणाऱ्या पोलिसांना निवासस्थानाअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या अस्तित्वात असलेली निवासस्थानेही जीर्ण झाले आहेत. सुमारे १० वर्षांपूर्वी बांधकाम विभागाच्यावतीने पोलिसांसाठी नवीन निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र १० वर्षानंतरही त्याला मंजुरी मिळाली नाही. जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण करून त्याचे विवरण विवरण मागून जवळपास दहा वर्षाचा कालावधी झाला. पण आतापर्यंत येथे एकही नवीन निवासस्थान उभे झाले नाही. वाढत्या गुन्हेगारीमुळे दिवसेंदिवस पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. सिंदेवाही पोलीस विभागाअंतर्गत गावांची संख्या वाढविण्यात आली. पण पोलीस बळवाढविण्यात आले नाही. पोलीस ठाणे परिसरातील निवासस्थाने अतिशय जीर्ण झाली आहेत. पावसाळ्यात ही निवासस्थाने गळतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागतो. अपुऱ्या निवासस्थानामुळे सर्व पोलिसांना निवासस्थान मिळत नाही. येथे पाच पोलीस अधिकारी व ५२ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकरिता निवासस्थाने होणे गरजेचे आहे. सध्यस्थितीत केवळ १० ते १२ निवासस्थाने अस्तित्वात आहेत. दोन अधिकाऱ्यांची राहण्याची सोय आहे. शासनाने त्वरित नादुरुस्त निवासस्थानांची दुरूस्ती करावी व नवीन निवासस्थानांचे तातडीने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
सिंदेवाहीत पोलिसांच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: December 26, 2015 01:21 IST