नागभीड (चंद्रपूर) : नियती कधी कधी का इतकी कठोर होत असेल हेच कळत नाही. अगोदरच आईच्या मायेची पाखर हरवून बसलेल्या मुलीचे लग्न जुळले आणि लग्न अगदी टप्प्यात असताना याच निर्दयी नियतीने मंगळवारी वडिलांवरही घाला घातला.
चक मोहाळी येथील रहिवासी आणि कानपा मौशी प्रभागाचे जि. प. सदस्य असलेल्या गोपाल मारोती दडमल यांच्याबाबत घडलेली ही गोष्ट.
अतिशय सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या गोपाल दडमल यांनी परिस्थितीशी संघर्ष करीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. असेच यशाचे आणखी शिखर पादाक्रांत केले. उच्चविद्याविभूषित असूनही गोपाल दडमल यांनी नोकरीच्या मागे न लागता राजकीय क्षेत्रात काम सुरू केले. ते गावच्या ग्रामपंचायतीवर दोनदा सदस्य म्हणून आणि जिल्हा परिषदेवरही निवडून आले. तत्पूर्वी त्यांचा एका शिक्षिकेशी विवाह झाला होता.
सुखाचा संसार सुरू असतानाच शिक्षिका असलेल्या पत्नीचा १२ वर्षापूर्वी एका आजाराने मृत्यू झाला आणि तीन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी गोपाल यांच्यावर आली. पण या संगोपनात व पालनपोषणात कुठलीही कमी पडू न देता तिन्ही मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण दिले. एका मुलीचा विवाह यापूर्वीच पार पडला. दुसऱ्या मुलीचा विवाह नुकताच जुळला होता. साक्षगंधासाठी २६ मार्च ही तारीखही काढण्यात आली होती. एवढेच नाही गोपाल दडमल यांनी आपल्या पातळीवर विवाहाची तयारी सुरू केली होती. मात्र निर्दयी काळाने असा घाला घातला की, मुलीचे हात पिवळे होत असल्याचा सुखद क्षण पाहण्याआधीच गोपाळराव यांचे प्राणपाखरू उचलून नेले.