ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याने रोवण्या खोळंबल्या
राजेश बारसागडे
सावरगाव : मागील काही दिवसात पावसाने दडी मारली. आणि पावसाअभावी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर आली होती. मात्र उर्वरित रोवणीचा हंगाम पंपधारक शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या साहाय्याने उरकविणार असताना ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड आल्याने सर्व ठप्प झाले. आता रोवणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला. ट्रान्सफाॅर्मरची तत्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आकापूर येथील शेतकऱ्यांनी सावरगाव येथील वीज वितरण कार्यालयावर धडक दिली.
तालुक्यातील आकापूर हे गाव जंगल परिसरात आहे. आणि शेतजमिनीही जंगलाला लागूनच आहेत. येथे नेहमी जंगली श्वापदांचा वावर असते. येथील पंपधारक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत ट्रान्सफाॅर्मरमध्ये अचानक बिघाड आल्याने ऐन रोवणीच्या हंगामात विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंपधारक शेतकरी चिंताग्रस्त झाले. दरम्यान समस्येचे निकारण करण्याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी मंगळवारी सावरगाव येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. कनिष्ठ अभियंता बोंडे यांच्याशी चर्चा केली आणि ट्रान्सफाॅर्मरची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली.
दरम्यान समस्या जाणून घेऊन अभियंता बोंडे यांनी तातडीने समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. लवकरच नवीन ट्रान्सफाॅर्मर बसवण्याचीसुद्धा हमी दिली. यावेळी भाकरे गुरुजी, धनराज बावणकर, तळोधी पत्रकार संघांचे सचिव भोजराज नवघडे, माजी सरपंच वेंकय्या भाकरे, तथा पंपधारक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
बॉक्स
अडचणीत पुन्हा भर...
मागील महिन्यात येथील गुराखी खटू कुंभरे याला वाघाने ठार मारले होते. शिवाय वन्यप्राण्याच्या छोट्या-मोठ्या घटना येथे घडतच असतात. येथील शेतकऱ्यांना नेहमीच दिवस असो वा रात्री जीव मुठीत धरूनच शेतात जावे लागते. याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे भयावह वास्तव असताना वीजपुरवठा खंडित होत असून यामुळे अडचणीत भर पडत आहे.
कोट
काही शेतकऱ्यांचे मोटरपंप बिघडत आहेत. या बाबीला महावितरण कंपनी कारणीभूत आहे. कारण जेवढा विद्युत पुरवठा पाहिजे. तेवढा मिळत नाही. बिल नाही भरले की तातडीने कनेक्शन बंद केले जाते. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाला तर एक-एक महिना तो बंदच राहतो. याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
- वेंकय्या भाकरे,
माजी सरपंच,आकापूर, ता. नागभीड