दोन दिवसीय कार्यक्रम : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारटेमुर्डा : येथून जवळच असलेल्या पिजदुरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४८ वा पुण्यस्मरण सोहळा हनुमान मंदिराच्या पटांगणावर झाला. घटस्थापना व पूजन टेमुर्ड्याचे ग्रा.पं. सदस्य चंद्रकांत दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन पिजदुऱ्याच्या सरपंच शीतल वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक यशवंतराव घोडमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्राम विस्तार अधिकारी पांढरे, उपसरपंच प्रकाश सोयाम, विष्णू पावडे, मधुकर उरकांडे, अरुण बरडे, वडगु सातपुते, तुकाराम हनवते, मनिषा पावडे, हरिभाऊ नक्षिणे आदी उपस्थित होते. या दोन दिवसीय कार्यक्रमात ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, ग्रामगीता वाचन, सामुदायिक ध्यानावर विचार, बाल किर्तनकाराचे किर्तन आणि राष्ट्रसंताची व गाडगे महाराजांची पालखी शोभायात्रा मिरवणूक १५ गावांच्या भजन दिड्यांसह काढण्यात आली. यावेळी ह.भ.प. लांबट महाराज नंदोरी यांच्या हस्ते कालयाचे किर्तन झाले. एस.टी. महामंडळातील सेवानिवृत्त वाहक रामभाऊ पावडे, नामदेव जेनेकर, संतोष नवघरे, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुदेव मंडळाचे माजी कार्यकर्ते स्वर्गीय संजय साळवे यांच्या पत्नी अनिता संजय साळवे व चंद्रकला सोयाम यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सरपंच कवडू आत्राम व त्यांचे सहकारी सुधाकर ढोके, गजानन जांभुळे आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)
पिजदुऱ्यात राष्ट्रसंताचा पुण्यतिथी सोहळा
By admin | Updated: February 10, 2017 01:00 IST