हिंदू संमेलन : चंद्रपुरात विश्व हिंदू परिषदेचे आयोजनचंद्रपूर : हिंदूंना मूलभूत गरजांसोबतच सन्मानही हवा आहे. अयोध्येत राम मंदिर बनणार नाही, तोपर्यंत हिंदूंचा भारतात सन्मान नाही. मंदिर प्रेमाने बनवू द्याल, तर प्रेमाने बनवू. विरोध केला तर प्रसंगी छातीवर पाय देऊनही मंदिर बांधले जाईल, अशी गर्जना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त स्थानिक लोकमान्य टिळक शाळेच्या प्रांगणात शनिवारी आयोजित विश्व हिंदू संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुनील महाराज, मनीष महाराज, डॉ. कन्ना मडावी, प.पू. आदित्यमुनीजी महाराज, रमणमुनीजी महाराज, भदंत सुमनवालेजी, सुवर्ण जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष किसनचंद चढ्ढा, पंकज अग्रवाल, दिनेश बजाज आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. तोगडिया पुढे म्हणाले, देशात लाखो हिंदूंचे धर्मांतर होत आहे, ही गंभीर बाब आहे. हिंदूंनी याबाबत जागृत होणे आवश्यक आहे. प्रेमाचे आम्ही समर्थक आहोत. प्रेम करा; पण सावित्रीची सानिया का बनत आहे ? प्रेम आहे तर धर्म का बदलावा लागतो ? प्रेमाची हीच व्याख्या असेल तर आतापर्यंत शेकडो निहाल राम का नाही बनले?, असा सवाल करीत ते म्हणाले, प्रेमाच्या नावाखाली जिहाद आणला तर शिवाजी महाराजांची तलवार घेऊन आम्ही हिंदू या विरोधात लढू. पूर्वी देशात ७०० कोटी हिंदू होते. आता १०० कोटी राहिले आहेत. विचार करा, हिंदू आताच जागृत झाला नाही तर पुढे दहाच कोटी हिंदू शिल्लक असतील. संपूर्ण पृथ्वीवर हिंदू पसरले होते. आता केवळ अर्ध्या भारतात सिमित झाले आहेत. पाकिस्तानात केवळ १ टक्का हिंदू वाचले आहेत. अफगाणिस्तानातून हिंदूंना हाकलून लावले. श्रीलंकेत हिंदूचे एकही मंदिर शिल्लक नाही. बॉम्बस्फोटात ते पाडून टाकले आहेत. त्यामुळे आता हिंदूंनी संघटित होणे गरजेचे आहे. हिंदू असल्याचा गर्व बाळगा, हिंदूंनो संघटित व्हा, १०० कोटी हिंदू एकत्र आले तर कुणीही हिंदूच्या केसाला धक्का लावणार नाही. विश्व हिंदू परिषदेचे संविधान लिहिण्यात काँग्रेस नेत्यांचेही योगदान होते. शिख, जैन यांनीही परिश्रम घेत या हिंदू परिषदेची स्थापना केली आहे, अशी माहितीही डॉ. तोगडिया यांनी दिली. मनीष महाराज म्हणाले, मानवी जीवनात तीन व्यवस्था असतात. भौतिक, आधुनिक आणि आध्यात्मिक. यापैकी आपण भौतिक आणि आधुनिक व्यवस्थेकडे सहज आकर्षित होतो. मात्र आध्यात्मिक व्यवस्थाच आपल्याला खरे आयुष्य मिळवून देते. त्यामुळे सनातन धर्माला जवळ करा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्ण जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष किसनचंद चढ्ढा यांनी केले. संचालन चैताली खटी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
अयोध्येत राममंदिर बनणारच- प्रवीण तोगडिया
By admin | Updated: December 13, 2014 22:36 IST