दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
तोहोगाव : गोंडपिपरी राजुरा तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था आहे. या रस्त्यावर मोठमोठ खड्डे पडले असल्याने या मार्गाने वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावार आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
अनुदान प्रकरणांचा निपटारा होणार!
चंद्रपूर : तालुक्यात धडक सिंचन विहीर योजनेची कामे करण्यात आली; मात्र खोदकाम करूनही बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. पंचायत समितीमध्ये ही प्रकरणे प्रलंबित होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. त्यामुळे अनुदान प्रकरणांचा निपटारा होणार आहे.
कर वसुलीअभावी कामे थंड बस्त्यात
चिमूर : कर वसुलीअभावी ग्रामपंचायतींची कामे थंड बस्त्यात आहेत. त्यातच शुक्रवारी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. अशा स्थितीत गावातील नियमित स्वच्छतेची कामे प्रभावित झाली. स्वच्छता होत नसल्याने नाल्या तुंबल्या. निवडणुकीनंतर गावांची स्थिती बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर येथे मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्री तसेच जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात; मात्र या ठिकाणी शेतकरी व जनावरांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरपना येथे दर शुक्रवारी तर गडचांदूर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो.
वीज खांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : शहरातील सिव्हिल लाईन्स तसेच रामनगर चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरातील रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले; मात्र वीज खांब काढण्यात न आल्यामुळे अनेक वेळा अपघात होत आहेत. त्यामुळे वीज खांब हटविण्याची मागणी केली जात आहे.
कोरपना-वणी बसफेऱ्या वाढवा
कोरपना : कोरपना व वणी येथून सायंकाळी ६ वाजतानंतर बसफेरी नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वणी या परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. मार्गावरील लालगुडा, वाघदरा, मंदर, केसुर्ली, चारगाव चौकी, शिरपूर, कुरई, आबई, वेळाबाई, ढाकोरी बोरी, मूर्ती गावातील नागरिकांना हीच शेवटची बस आहे. त्यामुळे दूर अंतरावरून येणाऱ्यांना वणीला मुक्कामी राहिल्याशिवाय पर्याय नाही.
पाणी पुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील विविध गावात पाण्याच्या टाक्या आहेत, पण शोभेच्या वास्तू ठरल्या. पाणी पुरवठा योजना मंजूर असतानाही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. परिणामी, विहिरींची पातळी खालावली. हातपंपालाही पाणी नाही. संबंधित विभागाने लक्ष देऊन पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आधार कार्डसाठी केंद्रावर गर्दी वाढली
चंद्रपूर : ग्रामीण भागातील काही गावांतील नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड नोंदणी केंद्र शोधताना सध्या नागरिक दिसत आहे. त्यामुळे गावागावात आधार कार्ड केंद्र सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरात हायमास्ट दिवे लावण्याची मागणी
चिमूर : चिमूर-कान्पा या मुख्य मार्गावरून जड वाहतुकीसोबतच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच मार्गालगत मिलन लॉनपर्यंत दुभाजक आहे; मात्र दुभाजकाच्या शेवटच्या टोकावर विद्युत पथदिवा नसल्याने अंधार पडलेला असतो. त्यामुळे परिसरात अपघात झाले आहेत; मात्र नगर परिषद व बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. हायमास्ट लावून चौकात गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली.
शहरातील एटीएममध्ये नोटांचा तुटवडा
सिंदेवाही : शहरात काही ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आली; मात्र मागील अनेक दिवसांपासून पैशाचा ठणठणाट दिसून येत आहे. तांत्रिक अडचणींमुळे एटीएम नेहमी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना बँकेत जावूनच पैसे काढावे लागत आहेत. बँक अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
नियमित लाइनमन द्यावा
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाइनमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी लाइनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
डास, कीटकांचा वाढला त्रास
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून डास व कीटकांचा त्रास वाढला आहे. अनेकदा रात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना डासांचा त्रास अधिकच सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातील नाल्यांमध्ये डास व कीटक प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करा
कोरपना : तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुंची गैरसोय होत आहे. त्यामुळे याठिकाणी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील कोरपना, वडगाव येथे तातडीने अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सिमेंटीकरणाची नागरिकांची मागणी
चंद्रपूर : येथील तुळशीनगर, वृंदावननगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल तयार होते. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.