सिंदेवाही : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व थकीत वीज ग्राहकांना नोटीस बजावून येत्या १५ दिवसांत वीज बिल भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा नुकताच दिला आहे. या नोटीसमुळे लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीची आशा मावळली असून, जनतेत शासनाविरुद्ध तीव्र असंतोष आहे.
कोरोना संकटामुळे अपरिहार्य ठरलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हरवले होते. परिणामी, शासनाने जनतेला मोफत अन्नधान्य, कर्जाच्या हप्त्यात सवलत अशा अनेक सुविधा दिल्या. त्या पार्श्वभूमीवर शासन लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करेल, अशी जनतेला अपेक्षा होती. मात्र विद्युत वितरण कंपनीने नुकत्याच बजावलेल्या नोटीसमुळे जनतेची आशा धुळीस मिळाली. अनेक वीज ग्राहकांकडे मार्च २०२० पासूनची बिले थकीत आहेत. विद्युत वितरण कंपनीने दर महिन्याच्या थकीत बिलावर व्याज आकारल्यामुळे या बिलाची रक्कम आणखी फुगली आहे. शेतकऱ्याच्या धानाची मोजणी झाली असली तरी चुकारे मात्र मिळालेले नाहीत. अनेक शेतकऱ्यांचे धान मोजणीच्या प्रतीक्षेत खरेदी केंद्रावर पडून आहेत. अशा परिस्थितीत एवढे मोठे बिल एकाच वेळी कसे भरावे, असा प्रश्न शेतकरी व ग्राहकांपुढे उभा झाला आहे. दरम्यान, शासनाने किमान लॉकडाऊन काळातील तीन - चार महिन्यांचे वीज बिल माफ करावे, अशी वीज ग्राहकांची मागणी आहे.