जिवती : जवळपास दोन अडीच वर्षापूर्वी मंत्रालयात मोठी आग लागल्यानंतर सर्वच शासकीय कार्यालयांनी आगीपासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अनेक कार्यालयांचे या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. बऱ्याच ठिकाणी लागणाऱ्या आगीमागे शार्टसर्किट हे एक मुख्य कारण असते. या दृष्टीने विविध कार्यालयांमध्ये प्रस्तुत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, वीज जोडण्या व इतर उपकरण हे असुरक्षित असल्याचे आढळून आले.येथील औद्योगिक प्रशिक्षण कार्यालयासमोरील भिंतीवर मुख्य वीज तारासह इतर वायरही अस्ताव्यस्तपणे लोंबकळलेल्या दिसून आल्या. काही ठिकाणी वायरला लावलेले जॉईन्टही व्यवस्थित नसल्याचे आढळले. तहसील कार्यालय भूमिअभिलेख कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात काही ठिकाणी वायर बिनधास्तपणे उघड्याच ओढलेल्या दिसुन आल्या. अशा प्रकारामुळे कार्यालयात केव्हाही शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय कार्यालयांमध्ये नेहमीच लोकांची वर्दळ असते. असे असताना या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही धोक्यात राहून कामे करावी लागत आहे. याची संबंधीत अधिकाऱ्यांनी योग्य दखल घेवून कार्यवाही करण्याची मागण केली जात आहे. (वार्ताहर)
कार्यालयामध्ये वीज जोडण्या असुरक्षित
By admin | Updated: September 22, 2014 23:17 IST