कोरपना : येथील तालुका क्रीडा संकुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधी व क्रीडा विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
सद्यस्थितीत या क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात झुडपाचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे खेळाडूंना खेळताना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. बास्केटबॉल कोर्ट व अन्य खेळाची मैदानाची कामे अपूर्णावस्थेत आहेत. येथे अद्यापही पिण्याच्या पाण्याची व विद्युत व्यवस्था नाही. क्रीडा प्रशिक्षक व चौकीदाराची नियुक्ती न करण्यात आल्याने बांधण्यात आलेल्या क्रीडा भवनाची नासधूस झाली आहे. या ठिकाणचे दरवाजे, खिडक्या, नळ चोरट्यांनी लंपास केले आहे. भवन बेवारस पडले असल्याने तळीराम मंडळी पेय पिण्यासाठी व असामाजिक तत्त्वाची मंडळी रात्रीच्या वेळी गैरकृत्य करण्यासाठी वापर करताना दिसून येतात. परंतु त्यावर कुणाचीही कुठलीच रोखठोक नसल्याने हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे. या भागातून स्वबळावर अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवर खेळणारे खेळाडू निर्माण झाले आहेत. मात्र त्यांना प्रशिक्षणासाठी व नव्या खेळाडूंना प्रोत्साहन निर्माण देण्यासाठी सुसज्ज क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात यावी व सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केली आहे.
बॉक्स
या सुविधांची व्हावी पूर्तता
क्रीडा संकुलात क्रिकेट, व्हॉलिबॉल, फुटबॉल आदी खेळाची मैदाने, क्रीडाविषयक साहित्य, प्रेक्षक गॅलरी, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत दिवे, तीन बाजूंनी पक्की संरक्षण भिंत, प्रवेशद्वार आदी सुविधांची सोय करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.