नीळकंठ नैताम पोंभुर्णा‘गाव तिथे दवाखाना’ असे शासनाचे ब्रिद असले तरी आजही ग्रामीण भागात आरोग्य सुविधेच्या नावाने बोंबाबोंब असल्याची विदारक वस्तूस्थिती आहे. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. मात्र ग्रामस्थांना आरोग्य व शिक्षणाच्या मुलभूत सुविधा पुरविण्यात हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे आजही पोंभूर्णा तालुक्यातील दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. पुरेशा प्रमाणात आरोग्य सेवा पुरविण्यात येत नसल्याने बरेच खासगी रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. अतिमागास आणि आदिवासी बहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील गावागावात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी तालुक्यातील ४५ हजार रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेतात. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत आणि तिनही वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी कार्यरत होते. त्यामुळे येथील आरोग्य सेवा सुरळीत सुरू होती. परंतु, डॉ, आनंद ठिकणे व उमरी येथील फिरत्या पथकावर असणाऱ्या डॉ. सरोज पुलकवार यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली. त्यांना या ठिकाणाहून जाऊन एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर वरिष्ठांना वारंवार येथील रुग्णांची होणारी हेळसांड सांगितल्याने मध्यंतरी डॉ. कायरकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची सुद्धा अल्पावधीतच बदली झाली आणि केवळ डॉ. विलास धनगे यांच्यावर संपूर्ण तालुक्यातील आरोग्य सेवेचे भार पडला. धनगे यांंच्या खांद्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या ४२ गावातील ४५ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. मात्र सेवा देताना ताण पडले अशातच त्यांची प्रकृती बिघडल्याने ते वैद्यकीय रजेवर गेले. त्यामुळे येथील संंपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली आहे. येथील आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी चंद्रपूर येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उमरी येथील फिरत्या पथकावर असलेले डॉ. टेंबे यांना दूरध्वनीवरुन बोलावून पर्यायी व्यवस्था करुन दिली. याठिकाणी ग्रामीण भागातून अनेक रुग्ण येत असतात. त्यामुळे बाह्य रुग्णांची चिकार गर्दी होत असते. एकच डॉक्टरवर संपूर्ण रुग्णांचा भार पडत असल्याने परिसरातील रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात सेवा देण्यास डॉ. टेंबे यांना अडचण येत संंपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली आहे.
पोंभुर्ण्याची आरोग्य सेवा आॅक्सिजनवर
By admin | Updated: September 16, 2015 00:56 IST