एटीएममध्ये ठणठणाट
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आल्या. मात्र मागील काही दिवसांपासून पैशांचा ठणठणाट दिसून येत आहे. तांत्रिक अडचणीमुळे एटीएम मशीन बंद असतात. त्यातच स्वच्छतासुद्धा नियमित केली जात नसल्याने कचरा दिसून येतो.
बंद सिग्नलमुळे वाहनधारक त्रस्त
चंद्रपूर : येथील पडोली चौक, मिलन चौक, ट्रायस्टार हॉटेल चौक परिसरातील रस्त्यावरील सिग्नल बंद असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांवर कामाचा ताण वाढला
चंद्रपूर : चंद्रपूर शहर तसेच अन्य पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी
चंद्रपूर : जंगलव्याप्त क्षेत्रात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या हंगामाचे दिवस असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना तारेचे कुंपण तसेच अन्य योजना सुरू कराव्या, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील रेती उचलण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. रेती उचलून रस्ते स्वच्छ करण्याची मागणी होत आहे. दुचाकी घसरून अनेकांचे अपघातही झाले आहे.
कचरा तुंबल्याने आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : शहरातील काही नाल्यांमध्ये कचरा तुंबल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यांवर येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाॅर्डनिहाय नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
आधार कार्डसाठी गर्दी वाढली
चंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड नोंदणी केंद्र ग्रामीण भागातही सुरू करावे, अशी मागणी होत आहे.०
वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यातच अनेक जण आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावत असल्याने शहरातील काही भागामध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
फायबर गतिरोधकामुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : अपघाताला आळा घालण्यासाठी प्रशासनाने चंद्रपूर- नागपूर रोडवरील हुतात्मा स्मारक परिसरात फायबर गतिरोधक लावले आहेत. मात्र ते अर्धेअधिक तुटले असून यामुळेच अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काढून नव्याने बसवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुर्गम भागात रस्ता बांधण्याची मागणी
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील महाराष्ट्र सीमेवर असलेल्या काही गावांत पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गावांत रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनपाच्या दुर्लक्षाने अतिक्रमण वाढले
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.