देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सोंडो अंतर्गत येणाऱ्या येरगव्हाण-सोंडो रस्त्याची दुर्दशा झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चिखलमय रस्त्यावरून चार किमी अंतरावर शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबविते, मात्र ग्रामीण भागात योजनांची पायमल्ली होत आहे. काही वर्षांपासून रस्त्याची खडीकरणाअभावी स्थिती जैसे थे आहे. याकरिता नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे निवेदन दिले. या मार्गावर शेतकऱ्यांची शेती असून तलावाकडे जाणारा हा एकमेव मार्ग असून शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी पावसाळ्यात अनेक अडचणी येत आहेत. या रस्त्याने पायी किंवा बैलबंडी वाहन ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.