पाणी व्यर्थ : शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न कायमवरोरा : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळाले पाहिजे, पाणी जमिनीत झिरपले पाहिजे, याकरिता सिंचन विभागाकडून वर्षभरापूर्वी गावागावात कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती केली. यामध्ये बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्याकरिता लोखंडी प्लेट लावण्यात येतात. परंतु अनुदानाअभावी अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट लावण्यातच आल्या नाही. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून जात आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सिंचनासाठी प्रश्न कायमच आहे. त्यामुळे शेतकरी दुबार हंगामापासून वंचित राहणार आहे.सिंचन विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. काम मंजूर असल्याने निधी येईलच, अशी आशा बाळगून ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन उधारीवर साहित्य घेवून बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यानजिकच्या शेतकऱ्यांना दुबारा पीक घेता येईल, असे वाटायला लागले. बंधाऱ्यांचे काम पूर्ण होवून कित्येक महिन्यांचा कालवधी लोटला. परंतु बंधाऱ्याच्या कामाचा निधी अद्यापही मिळाला नाही. निधीअभावी कोल्हापुरी बंधाऱ्याला लोखंडी प्लेटा लावता आल्या नसल्याने अनेक बंधाऱ्यात पाणी अडविले जात नाही. पाणी व्यर्थ जात आहे. सध्याच्या हंगामात सोयाबीनची कापणी सुरू असून सोयाबीन निघताच शेतकरी त्याच जमिनीवर बंधाऱ्यातून पाणी घेऊन चना व गव्हाचे उत्पादन घेत असतात. परंतु कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी साठवून राहत नसल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पीक घेण्याच्या आशेवर पाणी फिरले आहे. बंधाऱ्यात पाणी साठवून राहत नसल्याने येत्या काही दिवसात जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्लेटाविना कोट्यवधींचे बंधारे निकामी
By admin | Updated: October 23, 2016 01:07 IST