गडचांदूर : ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे गेल्या कित्येक वर्षांपासून भोंगळ कारभार सुरू असून यासंबंधी तक्रारी करून सुद्धा कारवाई केली नाही. माजी सरपंच रऊफ शेख हे स्वत: उपचार घेण्यासाठी शुक्रवारला रात्री ग्रामीण रुग्णालयात गेले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. सातभाई यांनी त्यांच्यावर उपचार न करता अवाच्च शब्दात बोलून अपमानीत केले.ग्रामीण रुग्णालयात अनेक गंभीर समस्या आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कळसकर फक्त स्वत:च्या खाजगी क्लिनीककडे लक्ष देत असून रुग्णाकडे लक्ष देत नाही. सर्वत्र अस्वच्छता आहे. शौचालय, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रुग्णावर उपचार होत नाही. औषधी बाहेरून विकत आणायला लावणे, अशा अनेक समस्या संदर्भात रऊफ शेख यांनी रात्रीच ९.३० वा. ग्रामीण रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.शनिवारी आ. संजय धोटे यांनी दुपारी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली व समस्या जाणून घेतल्या. याकडे जातीने लक्ष देऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रऊफ शेख यांनी आंदोलन मागे घेतले. मागण्यांची पुर्तता लवकर न झाल्यास पुन्हा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या जनआंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन भोयर, जिल्हा परिषद सदस्य अरुण निमजे, नगरसेवक निलेश ताजने, शरद जोगी, हरिभाऊ मोरे, हफिजभाई, अनंतराव चटप, शिवाजी सेलोकर, भाजयुमोचे रोहन काकडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रोहीत शिगाडे, मोहन भारती, हेमंत पातूरकर, इश्वर पडवेकर, गोपाल मालपानी, बंडू चौधरी, प्रकाश निमजे, वासुदेव गोरे, पुरुषोत्तम निब्रड, शिवाजी साबळे तथा इतरांनी पाठिंबा देऊन ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
डॉक्टरांच्या भोंगळ कारभाराविरोधात जनआंदोलन
By admin | Updated: December 10, 2015 01:23 IST