पेरमिलीतील वास्तव : दोन वर्षांपासून डॉक्टर बेपत्तापेरमिली : अहेरी तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेरमिली येथील पशुवैद्यकीय दवाखाना मागील दोन वर्षांपासून डॉक्टरअभावी शिपायाच्या भरवशावर आहे. जनावरांवर शिपायामार्फत थातुरमातूर औषधोपचार होत असल्याने या भागातील जनावरांना रोगांचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. पेरमिली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दोन वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी सेवा देण्याकरिता न आल्याने या भागातील जनावरांना योग्य औषधोपचारापासून वंचित राहावे लागत आहे. परिसरात पेरमिली येथील एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना असून जवळपास १० ते १५ गावांचा समावेश या दवाखान्याअंतर्गत आहे. मागील दोन वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी येथे सेवा देत नसल्याने शिपायालाच थातुरमातूर औषधोपचार जनावरांवर करावा लागत आहे. यंदा या भागात अज्ञात रोगाने जनावरांवर हल्ला केल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला. म्हशी, गायी, शेळ्या तसेच इतर पाळीव प्राण्यांचा अज्ञात रोगाची लागण झाल्याने मृत्यू झाला. पेरमिली परिसरातील महत्त्वपूर्ण गाव असल्याने या भागातील दहा ते पंधरा गावातील पशुपालक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना औषधोपचारासाठी आणतात. परंतु दुर्गम भाग असतानाही येथे पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
शिपाई चालवितो पशुवैद्यकीय दवाखाना
By admin | Updated: September 27, 2015 00:49 IST