‘त्या’ बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा पीसीसीएफला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 05:00 AM2022-05-12T05:00:00+5:302022-05-12T05:00:20+5:30

एकापाठोपाठ एक असे  हल्ले करून बिबट्या लोकांना ठार करीत आहे. गतवर्षी बिबट्याच्या हल्ल्यात आठ लोकांना जीव गमवावा लागला आहे. यावर्षी चार लोकांना बिबट्याने ठार करून काल अडीच वर्षीय चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. प्रत्येक घटनेच्या वेळी वनविभागाला वेठीस धरून  बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगितल्यानंतर जमाव शांत झाला.

PCCF proposes to shoot 'that' leopard | ‘त्या’ बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा पीसीसीएफला प्रस्ताव

‘त्या’ बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा पीसीसीएफला प्रस्ताव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : दुर्गापूर वाॅर्ड क्रमांक १ येथील  बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्यानंतर सध्या एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाला चांगलेच वेठीस धरले. घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगितल्यानंतर जमाव शांत झाला.
एकापाठोपाठ एक असे  हल्ले करून बिबट्या लोकांना ठार करीत आहे. गतवर्षी बिबट्याच्या हल्ल्यात आठ लोकांना जीव गमवावा लागला आहे. यावर्षी चार लोकांना बिबट्याने ठार करून काल अडीच वर्षीय चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. प्रत्येक घटनेच्या वेळी वनविभागाला वेठीस धरून  बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, वनविभाग याचा बंदोबस्त करण्याआधीच परत चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला झाल्याने दुर्गापुरातील संतप्त नागरिकांनी घटनास्थळी आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, सहायक वनसंरक्षक निकिता चौरे आणि त्यांची चमू यांना वेठीस धरले. उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून आश्वासन मिळेपर्यंत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी दोन दंगा नियंत्रण पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार स्वप्नील धुळे मोठा पोलिसांचा ताफा कसलीही  अनुचित घटना घडू नये याकडे लक्ष ठेवून होते. अखेर चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य संरक्षक प्रकाश लोणकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे घटनास्थळी आले. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर  तणाव निवळला.

आतापर्यंत १२ जणांचा बळी  
दुर्गापूर परिसरात या दोन वर्षांत नरभक्षी बिबट्याने बारा लोकांना ठार केले आहे. मंगळवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला. त्याअगोदर सायंकाळी सातच्या सुमारास दुर्गापूर वाॅर्ड क्रमांक २ येथील बशीर कुरेशी   यांच्या बकरीला  बिबट्याने ठार केले. तिला ओढत  वेकोलि उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयाच्या पाठीमागे नेऊन काही अंशी खाल्ले. रस्त्याच्या कडेनेच तो बकरीवर ताव मारीत होता. सततच्या रहदारीने  त्याने तिथून पळ काढला.

वनविभागाने जिवंत मुलीला दाखवले मृत
मागील काही महिन्यांपासून दुर्गापूर-उर्जानगर परिसरात बिबट व वाघाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्री वाॅर्ड क्रमांक १ येथील आरक्षा कोपूलवार रात्री अंगणात बसली असताना बिबट्याने हल्ला करुन तिला जखमी केले. दरम्यान त्या बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव वनविभागाने सादर केला. मात्र यामध्ये त्या मुलीला मृत दाखविण्यात आले आहे. सततच्या घटनेमुळे जनसामान्यांत धास्ती पसरली असताना वनविभाग किती गांभीर्याने प्रकरण हाताळत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. वनविभाग केवळ वेळ मारुन नेत आहे. मात्र यामुळे नागरिकांचा जीव जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केला आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे
हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याकरिता काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

 

Web Title: PCCF proposes to shoot 'that' leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.