लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : प्रवासासाठी मोजावे लागते अधिकचे अंतर
कोरपना : तालुक्यातील पारधीगुडा-जेवरा-भोईगुडा मार्ग स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही रखडलेलाच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
सद्यस्थितीत पारधीगुडा ते जेवरादरम्यानच्या मार्गाचे पंधरा वर्षांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, ते आज खडीकरण उखडून संपूर्ण मार्गच दगड धोंड्यांचा झाला आहे. जेवरा ते भोईगुडा मार्गाचीही तीच दशा असून, खडीकरणाचे काम पुनश्च होऊन डांबरीकरण होणे गरजेचे आहे, तसेच या दरम्यान असलेल्या नाल्यावर छोट्या पुलाची निर्मिती होणे पावसाळ्यात प्रवासात अडथळा निर्माण न होण्यासाठी आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास या परिसरातील गावांना कमी अंतरात प्रवास करणे सुखकर ठरेल, तसेच होणारी गैरसोयही दूर होईल. यासाठी लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.