चंद्रपूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी अज्ञात समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. त्याचे पडसाद चंद्रपुरातही उमटले. या हल्ल्यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील मान्यवरांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत घटनेचा निषेध केला.माजी आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक अॅड. एकनाथराव साळवे म्हणाले, गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला ही निंदणीय घटना असून व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्यांवरील हल्ला आहे. अशा घटनांमधून विचार कधीही दडपले जाऊ शकत नाही. याचा आम्ही निषेध करतो.राष्ट्रवादी काँग्रेस (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे म्हणाले, गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी महाराष्ट्रासाठी कलंक आहे. समाजवादी, पुरोगामी, दलित, कष्टकरी साम्यवादी विचारावर झालेला हा हल्ला असून या हल्ल्याचा निषेध करतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरीभाई पाथोडे म्हणाले, डॉ. दाभोळकरांवर झालेल्या हल्ल्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे. त्यांचे विचार संपविण्याचा हा एक हल्ला आहे. पुरोगामी विचार मांडत असल्याने काहींना ते खपले नाही. त्यांनी खरा शिवाजींचा इतिहास मांडला. यामुळे काही वर्ग दुखावला. पुरोगामी विचार संपविणे कठिण आहे. आजच्या घटनेमुळे पुरोगामी संघटना सावध झाल्या असून आणखी जोमाने कामाला लागणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
पानसरेंवरील हल्ल्याचा चंद्रपुरात निषेध
By admin | Updated: February 17, 2015 01:27 IST