वासेरा : भारत निर्माण योजनेंतर्गत पाच वर्षापूर्वी मंजूर झालेली चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊनही कंत्राटदार, पाणी पुरवठा समिती, अभियंत्याच्या वादात अडकली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत मौजा पळसगाव येथे ६८ लाख रुपयांची योजना पाच वर्षापूर्वी मंजूर झाली. पाच वर्षापासून सदर योजनेचे काम सुरू असून आतापर्यंत नळ योजनेची पाण्याची टाकी बांधकाम, विहीर, विद्युत पंप लाईन व गावापर्यंत पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यात आले. सदर कामावर देखरेख ठेवण्याकरिता गावात पाणी पुरवठा समितीची निर्मिती करण्यात आली. समितीच्या ठरावाला महत्त असून आर्थिक व्यवहाराचे अधिकार असून समितीला आहे. असे असतानाही या कामात समिती कुचकामी ठरत असल्याची गावात ओरड आहे.पळसगाव गावाची लोकसंख्या अडीच हजार असून गावात उन्हाळ्यात तिव्र पाणी टंचाई निर्माण होत असते. पाणी टंचाईचा विचार करता मागील पाच वर्षापासून सदर पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. पाच वर्षापासून काम रेंगाळत आहे. सदर कामाचे जुनेच अंदाजपत्रक असल्याने वाढीव अंदाजपत्रक मंजूर करणे आवश्यक आहे. कंत्राटदार, समिती व अभियंता एकमेकांना उडवाउडवीचे उत्तर देत वेळ मारुन नेत आहेत. वाढीव अंदाजपत्रक मंजूर करण्याकरिता अभियंत्याने स्वत:ची स्वाक्षरी न करता अंदाजपत्रक पाठवल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राटदार अभियंत्याकडे बोट दाखवून उर्वरित काम करण्यास टाळाटाळ करीत आहे तर समिती आम्ही सर्व ठराव दिल्याची माहिती गावकऱ्यांना देत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर गजभिये यांनी संबंधित अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी समितीने वाढीव ठराव दिलाच नसल्याचे स्पष्ट केले.संबंधित अभियंत्यांनी महिन्यात पळसगाव येथे येऊन गावकऱ्यांना लवकर पाणी देऊ, असे आश्वासन दिले. परंतु जुलै महिना होऊनही गावाला अजून पाणी मिळाले नाही. अजूनपर्यंत गावातील पाईपलाईन पूर्ण झालेली नाही तर पाणी कुठून मिळणार, असा प्रश्न निर्माण झला आहे. संबंधित अभियंत्यांनी स्वत:ची स्वाक्षरी न करता वरिष्ठ पातळीवर वाढीव अंदाजपत्रक पाठवल्याची माहिती समोर आली आहे. गावात वेगवेगळ्या चर्चेला पेव फूटला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावकऱ्याकरिता पाणी पुरवठा योजना सुरू करावी व पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
पळसगावची नळ योजना वादात अडकडली
By admin | Updated: July 30, 2014 23:56 IST