२४ तासात १५८१ मिमी पावसाची नोंदअनेक तालुक्यात शेकडो घरांची पडझड ब्रह्मपुरी व सिंदेवाहीत सर्वाधिक पाऊसलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा मंगळवारी संपली असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १०५.४४ च्या सरासरीने १५८१ मिमी पावसाची नोंद झाली. यात १२ तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली. त्यामुळे शेकडो नागरिकांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. संततधार पावसाने नदी, नाले दुथळी होवून वाहत असून शेकडो हेक्टरवरील शेतपीक पाण्याखाली आले आहे.विशेष म्हणजे, गतवर्षी १९ जुलै रोजीही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. याच दिवशी जिल्ह्यात १२८ च्या सरासरीने १२८.७३ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर पहिले एक-दोन नक्षत्र कोरडे गेली. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. समाधानकारक पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास सिंदेवाही, ब्रह्मपुरी येथे तर सायंकाळच्या सुमारास मूल, सावली, गडचांदूर, चंद्रपूर, वरोरा आदी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. चंद्रपुरात रात्रभर पाऊस सुरू होता. संततधार पावसाने अनेक शहर व गावातील घरात पाणी शिरल्याने अनेकांचे जिवनावश्यक साहित्य भिजले. ब्रह्मपुरी, सिंदेवाही, भद्रावती तालुक्यातील अनेकांच्या घरांची पडझड झाल्याने काहींना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले. बुधवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे पाणी ओसरले. मात्र पावसाची शक्यता कायम होती. या पावसाने नदी, नाले ओसंडून वाहत असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली. पावसामुळे माजरीत घरांची पडझड माजरी : येथे गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने परिसर जलमय झाले आहे. पावसामुळे १८ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास चैतन्य कॉलनी वॉर्ड नं. ३ येथील रहिवासी ज्योती सुधीश शाह यांच्या घराची भिंत कोसळली. दोन्ही खोल्यांची भिंती बाहेरच्या बाजूला पडल्याने जीवहानी झाली नाही. मात्र शाह यांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. घरातील खाण्यापिण्याचे अन्न धान्य व इतर साहित्य भिजल्याने महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा, शिरणा नदी, कोराडी, कोंढा, पळसगाव नाला तुडूंब होवून वाहत आहे. माजरीच्या रिना नदीच्या पुलावरुन पाणी असल्याने रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत हा मार्ग बंद होता. नागभीड तालुक्यात जनजीवन विस्कळीतनागभीड : मंगळवारी रात्री झालेल्या वादळी, मुसळधार पावसाने नागभीड तालुक्यातील जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले होते. यात काही घरांची पडझड झाली. मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वादळी मुसळधार पावसाची सुरुवात झाली. जवळपास एक तास पावसाने झोडपून काढले. वादळाच्या तडाख्याने भिंडाळा-बाळापूर आणि नागभीड तळोधी या रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. ही झाडे उचलल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या पावसाने मिंडाळा, बोंड, राजुली या गावातील घराचे नुकसान झाले असून या साझ्याचे तलाठी नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करीत असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली. पावसामुळे रात्रभर तालुक्यातील विजपुरवठाही बंद होता. त्यामुळे त्रास सहन करावा लागला.ब्रह्मपुरी तालुक्यात ४० घरांची पडझडब्रह्मपुरी : मंगळवारी तालुक्यात २०७.६ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस असून या पावसामुळे तालुक्यातील अंदाजे ४० घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली. यात कच्चा घरांचा समावेश आहे. तर ब्रह्मपुरी शहरातील जाणी वार्ड, धुम्मनखेडा आदी सखल भागातील घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. पावसाने जून व जुलै महिन्यात दडी मारली होती. परंतु मंगळवारी ही उणीव भरून काढत २०७.६ मिमी पाऊस एकाच दिवशी पडल्याने शेतकरी सुखावला आहे. बरडकिन्ही तुलान माल, नांदगाव, मेंडकी, खेडमक्ता, पिंपळगाव व अन्य गावांसह ब्रह्मपुरी शहरातील अनेक वॉर्डातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यात ब्रह्मपुरीमध्ये दोन घरांची पडझड झाली. या पडझडीत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने लावला आहे. गडचांदुरात घर कोसळलेगडचांदूर : पावसामुळे येथील एकता वॉर्ड नं. ४ मधील झिबलाबाई रमेश खैरे यांचे घर कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मंगळवारपासून येथे संततधार पाऊस सुरू असून अनेकांच्या घरांत पाणी शिरले आहे. झिबलाबाई खैरे यांचे घर कोसळले तेव्हा घरातील सर्व जण अंगणात कामात व्यस्त होते. त्यामुळे जीवीतहानी टळली. घर कोसळल्यामुळे घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले.मूलमध्ये ७० घरात पाणी शिरलेमूल : मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसाने मूल शहरासह तालुक्यातील ३४ घरे अंशत: पडली तर १ घर पूर्णत: कोसळले. तसेच ७० नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी तलावातील गाळ काढून जवळच असलेल्या झोपडपट्टीजवळ टाकण्यात आले आहे. त्यामुळे मूल शहरातील ७० घरांत पाणी शिरले. नगरपालिका व तालुका प्रशासनाने वेळीच मदतकार्य सुरू केल्याने या घरातील पाणी तलावात सोडण्यात आले आहे़ मूल येथील शेरकी सुपारी दुकांनात पाणी घुसल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. शहरात रस्ता व नालीचे बांधकाम काम सुरू असल्याने याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसला आहे. सोबत तालुक्यातील मारोडा, मोरवाही, विरई, हळदी गन्ना, नांदगांव येथे एक-एक घराची तर दाबगांव (मक्ता) नवेगाव (भु़), बाबराळा येथे दोन-दोन तसेच नलेश्वर मोकासा, सिंतळा, बेंबाळ, येसगाव येथे तीन घरांची पडझड झाली. तर मूल शहरातील १० घरे अंशत: पडली.
बारा तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:36 IST