भद्रावती : कर्नाटका पाॅवर कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे मागण्या मान्य न झाल्यास खाण परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा कामगार नेते राजू डोंगे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
कर्नाटका पाॅवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वीजनिर्मितीसाठी लागणारी शेतजमीन मौजा चेक बरांज व बरांज मोकासा येथून संपादित केली. परंतु कर्नाटका पाॅवर कॉर्पोरेशनतर्फे अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कर्नाटका पाॅवर कॉर्पोरेशन लिमिटेडला उत्खननाची परवानगी देण्यात आली. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बरांज खाण प्रकल्पग्रस्तांवर समस्यांचा डोंगर तयार झाला.
कर्नाटका पाॅवर कॉर्पोरेशनतर्फे कोळसा व माती उत्खननाचे कार्य करण्याकरिता एमडीओ म्हणून एम्टा कोल लिमिटेडची निवड करण्यात आली. परंतु एम्टा कोल लिमिटेडकडून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीतर सामावून घेतले नाही. जे काही कामगार सामावून घेण्यात आले त्यामध्ये बोगस प्रकल्पग्रस्त आहेत. त्यामुळे खरे प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित राहिले आहेत.
कर्नाटका पाॅवर कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच एम्टा कोल लिमिटेडला निर्देश देऊन लवकरात लवकर स्थानिक प्रकल्पग्रस्तांना बरांज खाणीमध्ये ट्रक तसेच इतर कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरीमध्ये सामावून घेण्याचे आदेश द्यावे. अन्यथा आपण स्वतः खाण परिसरात आत्मदहन करेल, असा इशारा कामगार नेता राजू डोंगे यांनी दिला आहे.