आचार्य टी. टी. जुलमे यांची मागणी : जलमहाल पर्यटक व अभ्यासकांसाठी बहुमोल ठेवा
चंद्रपूर : गोंडराजा खांडक्या बल्लाळशाहने बांधलेल्या जुनोना तलावातील जलमहाल पर्यटक व अभ्यासकांसाठी बहुमोल ठेवा आहे. त्यामुळे हा जलमहाल खुला करावा, अशी मागणी संशोधक, अभ्यासक आचार्य टी. टी. जुलमे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
गोंडराजा खांडक्या बल्लाळशाहने जुनोना येथे एक विस्तीर्ण तलाव व जलमहाल बांधला. वर्षातून काही महिने राजाचे वास्तव्य असे. राणी हिरातानी अत्यंत चतुर व सुलक्षणी होती. पतीची प्रकृती सुधारण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. त्यामुळे राजाला मोकळी हवा मिळावी, मन प्रसन्न व्हावे, यासाठी या स्थळाची निवड केली. ४ जुलै १९९९ रोजी केलेल्या निरीक्षणानुसार, जुनोना तलावाच्या पाळीची लांबी ५०० मीटर, उंची ९५० मीटर, १३२ हेक्टर सिंचन क्षमता व ९६ हेक्टर बुडीत क्षेत्र आहे. या स्थळाबाबतची संशोधनपर माहिती राज्य शासनाकडे पाठविण्यात आली, असेही आचार्य टी. टी. जुलमे यांनी सांगितले.
स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने महत्त्व
तलावाची पाळ ही दक्षिणेला आहे. तलावाच्या पाळीमध्ये पाण्यात दगडी फरशीने बांधलेल्या जागेत ८३ फूट लांब व १९५ फूट रुंद हौद तयार करून जलमहाल बांधला. जवळच विहीर आहे. विहिरीत उतरायला पायऱ्या आहेत. हा महाल दगडमातीने वरून बुजवून ठेवण्यात आला. हा थर काढल्यास जलमहाल पाहता येतो. स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने जलमहालाला मोठे महत्त्व आहे. धुंड्या रामशहाने १५९७-१६२२ मध्ये जलमहालाचा जीर्णोद्धार केला होता. एक महाल बांधला. पहारेकरी निवासाचे अवशेष आजही आहेत, अशी माहिती आचार्य टी. टी. जुलमे यांनी दिली.
परिसर विकास रखडला
जुनोना येथे २९ नोव्हेंबर २००१ रोजी उपाहारगृह, सभागृह व बालआनंदासाठी क्रीडा साहित्य उपक्रमाचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी तत्कालीन विभागीय आयुक्त ज. स. सहारिया, जिल्हाधिकारी जे. पी. गुप्ता, मुख्य अभियंता वि. ना. वासाडे, अधीक्षक अभियंता बिराजदार, कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे, एसडीओ पराते, उपविभागीय अभियंता हुंडे, चंद्रपाल चौकसे, बाळकृष्ण कोमावार उपस्थित होतो. तलावात नौकायनही सुरू झाल्याने जुनोना परिसर विकासाला गती मिळेल, असे वाटले होते. पण, त्यानंतर काही झाले नाही. त्यामुळे पुरातत्त्व व राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने जलमहाल खुला करण्याची मागणी आचार्य जुलमे यांनी केली आहे.