मूल : मूल ते ताडाळा मार्गावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ताडाळा येथून जवळ असलेल्या महाबीज प्रक्रिया केंद्राजवळ घडला. स्वप्नील दिवाकर गुज्जनवार (२८) रा. रामपूर हा जागीच ठार झाला, तर रवींद्र कावळे व चंद्रशेखर निकुरे रा. गडीसुर्ला हे गंभीर जखमी झाले. या दोघांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता हलविले आहे. अनिल हरिश्चंद्र झरकर रा. चकफुटाणा ता. पोंभुर्णा, लोभान नामदेव रामटेके रा. केळझर ता. मूल हे किरकोळ जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार, एचएच ३४ आरएच ४५३७ या दुचाकीने स्वप्नील गुज्जनवार व लोभान रामटेके हे दोघे मूल येथून ताडाळाकडे जात होते. एमएच ३४ डी ९७११ या दुचाकीने चंद्रशेखर निकुरे, अनिल हरिश्चंद्र झरकर व रवींद्र कावळे हे तिघेजण गडीसुर्ला येथून मूलकडे जात होते. दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन हा अपघात झाला. अधिक तपास मूल पोलीस करीत आहेत.