लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाराष्ट्र सरकारने विकासाच्या रोडमॅप अंतर्गत पहिल्या १०० दिवसांचा आराखडा तयार केला आहे. नागपूर विभागातही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आराखडा तयार झाला असून, यात विदर्भातील ११ जिल्ह्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी ती उपयुक्त ठरेल, अशी माहिती माहिती जनसंपर्क त महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
संचालक डॉ. मुळे म्हणाले, राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणारी ही शासकीय ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यम हे प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे या धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी. राज्य सरकारने अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. सामान्य लोकांना शासनाच्या सेवा वेळेत आणि तत्परतेने मिळाव्यात, यासाठीही पावले उचलली आहेत.
'एआय'चे प्रशिक्षण देणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिक जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे. त्यासाठी पत्रकारांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असे डॉ. मुळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा तत्पूर्वी संचालक डॉ. मुळे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांची भेट घेतली. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, पहिल्या १०० दिवसांच्या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कटिबद्ध आहे. सर्व जिल्ह्यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होईल, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले.