वरोरा : विद्युत देयके अदा करताना रांगेत उभे राहावे लागते. त्यात ग्राहकांचा वेळ व्यर्थ जातो. परिणमी अनेक वीज ग्राहक विद्युत देयके अदा करीत नसल्याने वीज वितरण कंपनीची ग्राहकाकडील थकबाकी वाढत होती. मात्र आता वीज वितरण कंपनीने विद्युत देयके अदा करण्यासाठी एटीपी मशीन बसविली असून ग्राहकांना विद्युत देयके एका मिनीटात अदा करुन पावती मिळणार आहे. ही सेवा दररोज सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार असल्याने वीज देयके अदा करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.वीज वितरण कंपनीने वीज देयके अदा करणे ग्राहकांना अधिक सुलभ व्हावे, यासाठी वीज वितरण कंपनी कार्यालय, बँक व खासगी कंपन्यांकडे बील स्विकारण्याचे केंद्र दिले. नागरिकांना या केंद्रावर पोहचणे सोपे व्हावे, यासाठी वेळेत बदल करून, सुटीच्या दिवशीही देयके अदा करणारे केंद्र अनेकदा सुरु ठेवले. आता वीज वितरण कंपनीने एटीपी (अल्ट्रा ट्रेलर पेमेंट मशीन) कार्यान्वित केल्या असून वीज वितरण कंपनीच्या विद्युत देयके अदा करण्याच्या ठिकाणी एटीपी मशीन ठेवली जाणार आहे. ही मशीन सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. एटीएम सारखी दिसणारी एटीपी मशीनमध्ये वीज देयके अदा करणाऱ्या ग्राहकांना प्रथम डिस्प्ले ओपन करावा लागणार आहे. त्यानंतर किती युनिट वापरले, हेदेखील ग्राहकांना पाहता येईल. त्या खाली वीज ग्राहकाने स्वत:चा क्रमांक टाकल्यानंतर विद्युत देयकाची रक्कम मशीनमध्ये टाकायची. रक्कम टाकताना एक-एक नोट टाकावी लागणार आहे या नोटांमध्ये बनावट व व खराब नोट असल्यास एटीपी मशीन ती नोट स्विकारणार नाही. रक्कम पूर्ण अदा झाल्यानंतर ग्राहकाला तात्काळ मशीनमधून पावती मिळणार आहे. यामध्ये चिल्लर पैशाअभावी ग्राहकाची अधिक रक्कम गेल्यास पुढील देयकातून ही रक्कम वजा करण्यात येणार आहे. एटीपी मशीनमध्ये देयके अदा करण्यासाठी केवळ एक मिनीटाचा कालावधी लागणार आहे. एटीपी मशीन २० हजार रुपयांपर्यंत देयके स्वीकारणार असून चेक व डिमांड ड्राप स्विकारणार नाही. ही मशीन स्वयंचलीत असल्याने तेथे कर्मचाऱ्याची गरज नाही. (तालुका प्रतिनिधी)
आता विद्युत देयके एटीपी मशीनद्वारे एका मिनिटात अदा करता येणार
By admin | Updated: September 25, 2014 23:20 IST