राकेश बोरकुंडवार
सिंदेवाही : कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी होत असतानाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. निवडणुकीसाठी नामांकनही दाखल झालेले आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. उमेदवारांना जनतेत मते मागायला जाताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी लागणार आहे. हस्तांदोलन न करता हात जोडून, रामराम करूनच मते मागावी लागणार आहेत. उमेदवारांना कोरोनाबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे.
१५ जानेवारीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. प्रचारादरम्यान उमेदवार अनेकांच्या संपर्कात येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी उमेदवारांना घ्यायची आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेण्याच्या नादान उमेदवारांकडून हस्तांदोलन केले जाऊ शकते. यातूनही कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना आपली कोरोना तपासणी करून त्याचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावयाचा आहे. प्रचारादरम्यान, एखाद्या कोरोना रुग्णाशी उमेदवाराने हस्तांदोलन केले आणि अन्य मतदारांची भेट घेतली तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते. या अनुषंगानेही खबरदारी घेतली जात आहे.