मेंडकी: ब्रह्मपुरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या ४ आॅगस्टला होणार आहे. या निवडणुकीसाठी मेंडकी येथील थानेश्वर केशव कायरकर या उमेदवाराने मेंडकी ग्रामपंचायत मतदार संघातून आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र हे करताना त्याने अर्जासोबत बनावट दस्तावेज लावून आपण आर्थिक दुर्बल घटकात मोडत असल्याचे दाखविले असून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी चिचखेडा गट ग्रामपंचायतीचे सरपंच रणवीर रमेश डाकरे यांनी केली आहे. मेंडकी येथील थानेश्वर केशव कायरकर यांनी मेंडकी मतदार संघातून आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर २२ जुलै रोजी त्यावर आक्षेप सादर करण्यात आला. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थानेश्वर कायरकर यांच्या अर्जाची योग्य शहानिशा न करता तो वैध ठरविण्याला असा आरोप रणवीर डाकरे यांनी केला आहे. थानेश्वर कायरकर हे आर्थिक दुर्बल घटकात मोडत नाहीत. थानेश्वर कायरकर यांनी ब्रह्मपुरी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला अर्जाला न जोडता तो दाखला आॅनलाईन पद्धतीने काढण्यात आला आहे. या दाखल्याचा दुरुपयोग करुन कायरकर यांनी तो निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल करताना वापरला. कायरकर यांच्याकडे सहा लाख रुपये किंमतीची चारचाकी गाडी , ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी, ११ लाख रुपये किंमतीची ५.६९ एकर शेतजमीन, दोन लाख रुपये किंमतीचे मेंडकी येथील घर अशी एकूण १९ लाख ५० हजार रुपयांची संपत्ती असल्याचे पुरावे, डाकरे यांनी सादर केले आहे. मात्र कायरकर यांनी ब्रह्मपुरी तहसीलदारांना १.१० एकराचा सातबारा सादर करुन २४ हजाराच्या आतील उत्पन्नाचा दाखला आॅनलाईन पद्धतीने घेऊन ब्रह्मपुरी तहसीलदारांची दिशाभूल केली आहे. थानेश्वर कायरकर यांच्याकडे १९ लाख ५० हजारांची संपत्ती असताना त्यांना २४ हजारांच्या आतील उत्पन्नाचा दाखला मिळाला कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. थानेश्वर कायरकर हे आर्थिक दुर्बल घटकात मोडत नसून बनावट व खोटे दाखले जोडून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर केला आहे.मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज वैध ठरविला आहे. त्यामुळे थानेश्वर कायरकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी रणवीर ठाकरे यांनी केली आहे. (वार्ताहर)
बनावट पुराव्याच्या आधारे नामांकन अर्ज
By admin | Updated: July 29, 2015 00:49 IST