नागरिक भोगतात नरकयातना : गौरी (कामतगुडा) गावातील स्थिती शंकर चव्हाण जिवतीएकीकडे शहरात गुळगुळीत रस्ते पाहायला मिळते. त्यामुळे खराब रस्ता कशाला म्हणतात, हे शहरवासीयांना समजले नसेल. पण शहर सोडले की पहाडावर भयाण स्थिती आहे. अनेक गाव गुड्यातील रस्ते पाहिल्यास जीवन जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो, याचे वास्तव लक्षात येईल. अशा कठीण परीस्थितीत पहाडावरील नागरिक जगत असून अशीच विदारक स्थिती दोन राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या पुडीयालमोहदा ग्रामपंचायत मधील गौरी (कामतगुडा) गावात बघायला मिळत आहे.तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर हे गाव आहे. गावात विकासाची गंगा वाहण्यासाठी डांबरीकरणाचे रस्ते नाहीत. त्यामुळे शासनाची दोन शिक्षकी शाळा सोडली तर गावात कुठल्याच योजनेचा श्रीगणेशा झाला नाही. गाव दोन राज्याच्या कचाट्यात आहे. दोन्ही राज्याची विकास यंत्रणा या गावात राबवली जाते. मात्र पक्या रस्त्याची सोय करण्यात दोन्ही राज्य अपयशी ठरले आहेत.शासन एकीकडे डिजीटल भारताची स्वप्न बघत आहे तर दुसरीकडे रस्त्याअभावी नागरिकांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. गावात जायला योग्य रस्ते व्हावे, शासनाच्या मुलभुत सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायतमध्ये ठरावही घेण्यात आला; शासन दरबारी दाद मागितली. पण कुणालाही पाझर फुटला नसल्याचे मत नागरिकांनी जि.प.सदस्य पंकज पवार यांच्या समोर मांडली.सीमावादात अडकलेल्या गावाचे शासन निकाल लावत नाही आणि विकासही करत नाही. त्यामुळे येथील नागरिक हतबल झाले आहेत. गावात दोन्ही राज्यातर्फे निवडणूका घेतल्या जातात. येथील मतदारांच्या भरोशावर लोकप्रतिनिधी सत्ता भोगतात. परंतु, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कुणीच प्रयत्न केले नसल्याचे बोलले जात आहे. आज गावात जायला रस्ता नाही, आरोग्याच्या सोयीसुविधा गावात मिळत नाही, रोजगाराची साधने नाही यासह अनेक समस्या गावात आवासुन असून आता तरी या रखडलेल्या समस्या सुटतील काय, असे प्रश्न नागरिक करीत आहेत. सीमावाद सुटेल काय? गेल्या अनेक वर्षापासून जिवती तालुक्यातील १४ गावांचा सीमावादाचा प्रश्न कायम असून या वादग्रस्त गावात दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत असतानाही मुलभूत सोयीसुविधा का मिळाल्या नाहीत. संघर्षमय जीवन जगताना आमच्या अनेक पिढ्या निघून गेल्यात. पण आमच विकास झाला नाही. आम्ही नेमके कोणत्या राज्याचे आणि कुणाकडे न्याय मागायचे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून आता तरी सीमावाद सुटणार काय, असेही नागरिक विचारू लागले आहेत.
रस्ता तर नाहीच, आरोग्य सेवाही मिळत नाही!
By admin | Updated: September 1, 2016 01:26 IST