A new direction for self-employment | स्वयंरोजगाराची नवी दिशा
स्वयंरोजगाराची नवी दिशा

ठळक मुद्देप्रमाणपत्र व साहित्य वितरण : आदिवासी विद्यार्थ्यांना बांबू कलाकुसर प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित व्हावे, विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर आणि बांबू संशोधन, प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना ‘बांबू हस्तकला कौशल्य विकास प्रशिक्षण’ देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर आणि बांबू संशोधन, प्रशिक्षण संस्थेचे संचालक राहुल पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र, वस्तू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य देण्यात आले.
घरातील विविध आकर्षक वस्तुने सजावट करण्यासाठी नावीन्य हवे असते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने सजावटीचा हा प्रवाह ओळखून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘बांबू हस्तकला कौशल्य विकास प्रशिक्षण’ उपक्रम राबवला होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर आणि बांबू संशोधन, प्रशिक्षण संस्थातर्फे १ ते ९ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या आकर्षक वस्तूंची माहिती देण्यात आली. दहावी उत्तीर्ण झालेल्या ४० विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून बांबूपासून शोभीवंत वस्तू, चप्पल, शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात २९ विद्यार्थी आणि ११ विद्यार्थिनींनी बांबूपासून शोभीवंत वस्तू तयार केल्या.
सदर प्रशिक्षणात सहभागी झालेले विद्यार्थी भविष्यात शहरी बाजारपेठेची गरज ओळखून आपल्या कौशल्याने स्वयंरोजगार मिळवू शकतात, असा आदिवासी विकास विभागाला विश्वास आहे. बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतील विविध प्रशिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांना सामावून घेतल्यास गावागावातील तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकतो, या उद्देशाने नाविन्यपूर्ण योजनेतून ‘बांबू हस्तकला कौशल्य विकास प्रशिक्षण’ उपक्रम राबवण्यात आला. संचालक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांसोबत रोजगाराभिमुख प्रशिक्षण राबवण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे चंद्रपूर प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.


Web Title: A new direction for self-employment
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.