चंद्रपूर : राज्य शासनाच्या ५९ व्या हिंदी अंतिम नाट्य स्पर्धेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय संस्थेचे ‘हॅलो राधा मै रेहाना’ हे नाटक राज्यात प्रथम आले. या नाटकात रेहानाची मुख्य भूमिका साकारणाऱ्या नूतन धवने यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रौप्यपदक जाहीर झाला. राज्य नाट्य स्पर्धेतील त्यांचे हे आठवे रौप्यपदक आहे.
याआधी चिंधी बाजार नाटकासाठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक व अंतिम फेरी, ध्यानीमनी आणि ज्याचा त्याचा प्रश्न या नाटकांसाठीही रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या. नूतन धवने यांनी सलग तीन वर्षे प्राथमिक व अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रौप्यपदकाची हॅटट्रिक केली आहे. १८ वर्षांच्या रंगप्रवासात आठ रौप्यपदकांसह काही सावल्यांचे खेळ, दरवळतो अजून गंध, अन् ते सूर गवसले, एक चॉकलेट प्रेमाचं, ईदी, रंगबावरी आदी नाटकांमध्ये केलेल्या भूमिकांसाठी पुरस्कार मिळाला आहे. कामगार राज्य स्पर्धेच्या प्राथमिक व अंतिम फेरीतही अनेक नाटकांसाठी त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत.