बेरोजगारांची फौज : नळयोजनेअभावी पाण्यासाठी पायपीटघोडपेठ : येथून जवळच असलेल्या घोट-निंबाळा-हेटी ही गट ग्रामपंचायत असून या गावांतील नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. मात्र नागरिकांच्या समस्यांकडे शासकिय यंत्रणेचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.शेती करून आपले कुटूंब जगविणे हा येथील नागरिकांचा व्यवसाय आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल झालेले येथील शेतकरी बांधव जवळच्याच आॅर्डनन्स फॅक्टरीमध्ये रोजंदारीने जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीवर जगायचे कसे, हा येथील नागरिकांसमोरचा मोठा प्रश्न आहे.भद्रावती येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र आजपर्यंत एकही प्रकल्प न आल्याने परिसरातील सुशिक्षित युवकांना बेरोजगारीचे जिणे जगावे लागत आहे.गावात सरकारी नळयोजना नसल्याने महिलांना विहीरीचे पाणी काढून आपली तहान भागवावी लागते. या विहीरीतील पाणी पावसाळ्यात गढूळ असते, तर उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे बरेचदा विहीरीला पाणी नसते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा येथील महिलांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.विजेच्या बाबतीतही हे गाव दुर्दैवीच ठरले आहे. येथील विजपुरवठा सतत खंडीत होत असतो. पावसाळ्याच्या दिवसांत बरेचदा या गावांतील वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीची व्यवस्था नसल्याने मोकळ्या जागेत आणि रस्त्यांवरच नागरिकांना कचरा टाकावा लागत आहे. महामार्गावरून निंबाळा हे गाव अंदाजे दोन किलोमिटर आतमध्ये आहे. मात्र या गावात जाणारा रस्ता हा पूर्णपणे उखडला असून या रस्त्यावरून ये-जा करणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे. तसेच प्राथमिक शिक्षणानंतर गावात शिकण्याची सोय नसल्याने शिक्षणासाठी घोडपेठ किंवा भद्रावतीला जाणा-या विद्यार्थ्यांनासुध्दा याच रस्त्याने जाणे - येणे करावे लागत असल्याने नादुरूस्त रस्त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.गावातील नागरिकांचे आरोग्य बिघडल्यास उपचारासाठी घोडपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. महामागार्पासून लांब असल्याने अचानक रात्री लहान बालके किंवा वृध्द नागरिकांची प्रकृती बिघडल्यास दवाखान्यापर्यंत पोहचण्यासाठी बरीच कसरत करावी लागते.गावात अजुनपर्यंत महामंडळाच्या बसची सेवा पोहोचली नसल्याने नागरिकांना निंबाळा ते महामार्ग हा अंदाजे दोन किलोमिटरचा रस्ता पायी चालत जावे लागते. मात्र, महामार्गावर या गावातील नागरिकांसाठी बसस्थानकच नसल्याने प्रवाशांना उन्ह पावसात ताटकळत उभे रहावे लागते. महामार्ग चौपदरीकरणात जुने असलेले बसस्थानक तोडण्यात आले. मात्र नवीन बसस्थानक बांधण्यात आले नाही. प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेवून भद्रावती येथील गौतम गेडेकर यांनी बसस्थानक बांधण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
निंबाळावासीयांच्या समस्यांकडे शासनाचेही दुर्लक्ष
By admin | Updated: December 23, 2015 01:23 IST