बाखर्डी : आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला स्वतःकडे पाहायला अजिबात वेळ नाही. दिवसभर बसून काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे संतुलित आहार काळाची गरज आहे, असे मत डॉ. भूषण मोरे यांनी व्यक्त केले.
ते ग्रामपंचायत निमणी व अंबुजा फाउंडेशन उपरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा निमणी येथे मकरसंक्रांतीनिमित्त पोषण आहार महिला मेळावा कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर टेकाम होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच उमेश राजूरकर, ग्रामसेवक रवी बोढे, आशा गटप्रवर्तक सविता जेणेकर, सिद्धेश्वर जंपलवार, श्वेता देवगडे, नेहा जगताप, पुष्पा चुनारकर, अशोक झाडे, शंकर आत्राम, भालचंद्र कोंगरे, ग्रामपंचायत सदस्य गिरजाबाई गोबाडे, सुमन जगताप, अश्विनी टेकाम, सुनंदा टोंगे, अंगणवाडी सेविका सोनल राजूरकर, कांता टेकाम आदी उपस्थित होते.
पोषण आहार महिला मेळाव्यात २५ महिलांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक पूजा घाटे, द्वितीय क्रमांक नेहा राजूरकर तर तृतीय क्रमांक महानंदा घाटे यांनी पटकाविला. सोबतच ग्रामपंचायत निमणीकडून किशोरी मुली व महिलांना शंभरहून अधिक सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन पल्लवी घाटे, प्रास्ताविक नेहा जगताप तर आभार शीला टोंगे यांनी मानले.