चंद्रपूर : आनंद मूकबधिर विद्यालय, आनंदवन, वरोरा येथील कलाशिक्षक हरिश्चंद्र ढोबळे यांनी कोरोना कालावधीत उत्कृष्ट अशा कलाकृती बनविण्यात वेळेचा सदुपयोग केला. यातच त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पेंटिंग स्पर्धा, प्रदर्शनात भाग घेतला. व्यक्तिचित्र, समकालीन चित्र अशा विषयावर त्यांनी विविध चित्रे रेखाटली. ‘फोरम फॉर यबल’ या संस्थेतर्फे आयोजित स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर दुसरे बक्षीस १० हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यापूर्वी ‘थर्ड आय आर्टिस्ट आंतरराष्ट्रीय ग्रुप’तर्फे त्यांच्या चित्राला मेरिट अवॉर्ड, ‘आर्ट बीट’ कला पुणे, संस्थेतर्फे गोल्ड मेडल, ‘कला अनंत सोसायटी’ डेहराडूनतर्फे, कला अनंत अवॉर्ड, ‘अब्दुल कला फाऊंडेशन’ कर्नाटकतर्फे ॲप्रेसिएशन अवाॅर्ड, रिअल आर्ट पॉइंट, हैदराबादतर्फे मेरिट रनरअप अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.
ढोबळे हे उत्तम चित्रकार असून एक उत्तम कलाध्यापक आहेत. वरोरा येथे शालेय कलाशिक्षण, कला प्रसारात त्यांचे अमूल्य काम असून, याअगोदर ही त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वरोरा शहरासोबत,चंद्रपूर जिल्ह्याचे नाव ढोबळे यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे.