मोहाळी (मो.) : नागभीड तहसिल कार्यालयाच्या तुघलकी कारभाराने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कारभाराचा फटका कानपा येथील शाहू पुंडलिक भानारकर या वृद्ध शेतकऱ्याला बसला. कानपा येथे दिनांक ४ आॅगस्टला वादळासह आलेल्या अतिवृष्टीने शाहू भानारकर या शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यु झाला. त्यात अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा कानपा येथील तलाठ्याने सरपंच तसेच इतर प्रमुख पंचासमक्ष पंचनामा अहवाल तयार करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सदर अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केला. मात्र घटनेवरून तब्बल सात महिने उलटल्यानंतरही ४ आॅगस्टला कोणतीच अतिवृष्टी किंवा वादळ आले नव्हते, अशा जावईशोध पर्जन्यमान नोंदवहीच्या आधारे तहसील कार्यालयाने लावला. तसे पत्रही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पाठवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वादळाने चिंचेच झाड बैलाच्या अंगावर कोसळल्याने त्यात बैल ठार झाला, अशी नोंद तलाठ्याने केलेल्या पंचनाम्यात स्पष्ट असताना तहसील कार्यालयाने पर्जन्यमान नोंद वहीचा आधार घेत संबंधित शेतकऱ्याला मदत नाकारून आपल्या तुघलकी कारभाराचा परिचय दिला. या प्रकाराने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)
नागभीड तहसीलच्या तुघलकी कारभाराने शेतकरी त्रस्त
By admin | Updated: March 26, 2016 00:44 IST