बल्लारपूर : आगामी विधानसभा निवडणूक राज्याला दिशा देणारी आहे. काँग्रेस पक्षासह विविध पक्ष स्वबळावर निवडणूकांना सामोरे जात आहे. यासाठी मतदारांची कसोटी लागणार आहे. प्रत्येक पक्ष आम्हाला सत्ता द्या म्हणून आर्जव करीत आहेत. काँग्रेस पक्ष सर्वसामान्याच्या पक्ष असून विकासासाठी झटणारा आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता घनश्याम मुलचंदानी आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपा हा पक्ष मित्र पक्षासोबत प्रामाणिक राहू शकत नाही, अशा विश्वासघाती पक्षापासून मतदारांनी सावध राहून काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी घनश्याम मुलचंदानी यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेतून केले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस व पीरिपा पक्षाचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवारी पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा, उमरी पोतदार, देवाडा खुर्द व मूल तालुक्यातील भेजगाव व चिरोली येथे जाहीर सभा घेण्यात आली. याप्रसंगी उमेदवार घनश्याम मुलचंदानी म्हणाले, विकास कामे करणारा माणूस साहित्य वाटून मतदारांना आकर्षित करीत नाही. यावरुन त्यांच्या खोटारडेपणा मतदारांना दिसून येत आहे. तुम्ही मला पाच वर्षाची संधी द्या, मतदारांचा विश्वासघात करणार नाही, अशी हमी मी तुम्हाला देतो, असे भावनिक आवाहन घनश्याम मुलचंदानी यांनी निवडणूक प्रचार सभेतून केले. पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील जाहीर सभेला माजी खासदार नरेश पुगलिया, उमेदवार घनश्याम मुलचंदानी, गजानन गावंडे, देवराव भांडेकर, माजी खासदार राजेश निलया आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
मुलचंदानी विकासासाठी कटिबद्ध- नरेश पुगलिया
By admin | Updated: October 9, 2014 23:00 IST