रवी जवळे - चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिका हद्दीत शहर विकास आरखड्यानुसार अनेक भूखंड विविध गोष्टींसाठी आरक्षित करण्यात आले आहे. आरक्षित भूखंडांवर नियोजनाप्रमाणे कामे होऊ शकली नाही. त्यामुळे हे भूखंड अनेक वर्षांपासून मोकळे आहेत. आता या भूखंडांवर नागरिकांची वक्रदृष्टी पडली असून अनेक आरक्षित भूखंड गडप झाल्याची शक्यता आहे. मात्र याबाबत गंभीर नसलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे आजवर याचे स्पॉट व्हेरीफिकेशन झाले नाही. त्यामुळे पुढे शहर विकासात मोठा अडथळा निर्माण होणार आहे.कोणत्याही शहराचा विकास करताना योग्य पध्दतीने नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी शहर विकास करण्यापूर्वी नियोजन आराखडा तयार केला जातो. चंद्रपूर शहरासाठीही हा विकास आराखडा नगर रचना विभागाकडून तयार करण्यात आला. त्याला महापालिकेने २०१२ मध्ये मंजुरीही दिली आहे. या विकास आराखड्यानुसार शहर विकास होणे अपेक्षित असताना विकासकामात या आरखड्याला बगल दिली जात असल्याचे सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामावरून दिसून येते. केवळ रस्त्यांचीच कामे नाही तर सर्व बाबतीत आराखड्याचा धुव्वा उडविला जात आहे. यामुळे पुढे शहर विकासात मोठा अडथळा निर्माण होणारे हे स्पष्ट दिसत आहे.नगरविकास आरखड्यानुसार प्रत्येक गोष्टींसाठी भूखंड आरक्षित केले जाते. त्यात दवाखाना, रस्ते, शाळा, क्रीडांगण, बगिचा आदींचा समावेश असतो. प्रत्येक लेआऊटमध्ये लेआऊटच्या क्षेत्राच्या १० टक्के जागा ओपनस्पेस म्हणून आरक्षित ठेवली जाते. मात्र चंद्रपुरातील अनेक लेआऊटमध्ये अशी आरक्षित जागा कुठेच दिसत नाही. अशीच अवस्था क्रीडांगण व बगिच्यांची झाली आहे. चंद्रपुरातील ६४ वार्डाचे क्षेत्र गृहित धरल्यास या शहरात किती बगिचे व क्रीडांगण असले पाहिजे, हे शहर विकास आराखड्यात नमूद असेलही; मात्र शहरात परिस्थिती भिन्न आहे. शहराचा पसरा बघता बागबगिचे व मुलांबाळांसाठी असलेले क्रीडांगणे कमी दिसतात. वास्तविक या बाबींसाठी शहर विकास आराखड्यात भूखंड आरक्षित आहेत. मात्र नगरपालिका अस्तित्वात असतानापासून याकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे कुठल्याच वापरात नसलेले हे भूखंड नागरिकांनी हळूहळू आपल्या ताब्यात घेणे सुरू केले आहे. या आरक्षित भूखंडांची सध्या वाट लागली आहे. महानगरपालिकेने व नगर रचना विभागाने या आरक्षित भूखंडांची गांभीर्याने चौकशी करणे आता गरजेचे झाले आहे.
आरक्षित भूखंडांचा मनपाला विसर
By admin | Updated: August 9, 2014 23:37 IST