यंग चांदा ब्रिगेडची मागणी : महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर : महानगरपालिकेतील ६५ नालासफाई कामगारांपैकी केवळ ३५ कामगारांनाच कामावर घेण्यात आले. परंतु, अन्य कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. त्यामुळे सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
महापालिकेकडे नाला सफाईच्या कामाकरिता ६५ कंत्राटी कामगार आहे. गरजेनुसार या कामगारांचा वापर केला जातो. कोरोनाकाळात शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कामगारांनी कर्तव्य बजावले. मात्र यातील केवळ ३५ कामगारांनाच कामासाठी राखीव ठेवले आहे. परिणामी, ३० कामगार बेरोजगार झाले आहेत. मागील तीन महिन्यांपासून हे कामगार बेरोजगार असल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील घाण काढून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या कामगारांवर अन्याय करणे योग्य नाही. महापालिकेच्या आयुक्तांनी रोटेशन पद्धतीने या कामगारांना काम देण्याचे मान्य केले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, अल्पसंख्याक विभागाचे शहर संघटक सलीम शेख, वंदना हातगावकर, करणसिंह बैस, राहुल मोहुर्ले, दूर्गा वैरागडे, आदी उपस्थित होते.