चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुका सहा महिने पुढे ढकलाव्या, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन दिले.
राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर करीत जनतेने खबरदारी न घेतल्यास लॉकडाऊन लागू करण्याचे म्हटले आहे. दरम्यान, जिल्ह्यात चिमूर नगरपरिषद, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती, कोरपना या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर जिल्हा परिषदेच्या दोन जागेसाठी व पंचायत समित्यांच्या चार जागांसाठी व बल्लारपूर नगरपरिषदेच्या दोन जागांसाठी पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी मतदान यादीची कामे सुद्धा पूर्ण झाले आहेत. या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणुका सहा महिने पुढे ढकलाव्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात देवराव भोंगळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, उपाध्यक्षा रेखा कारेकर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय गजपूरे, जिल्हा परिषदेचे सभापती नागराज गेडाम, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष ॲड. हरीश गेडाम, जि.प. चे माजी सभापती संतोष तंडपल्लीवार यांची उपस्थिती होती.
बाॅक्स
वीज कनेक्शन कापण्याच्या मोहिमेला स्थगिती द्या
लॉकडाऊन काळातील गरीब नागरिकांचे वीजबिले माफ करावे तसेच वीज कनेक्शन कापू नये. सोबतच अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.