प्रशासकीय कार्यात अनियमितता : विरोधी पक्षाच्या प्रभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षब्रह्मपुरी : शासनाच्या नियमानुसार महिला नगराध्यक्षांच्या पतीला प्रशासनात हस्तक्षेप करता येत नाही. परंतु नगराध्यक्ष रिता उराडे यांचे पती दीपक उराडे पालिका प्रशासनामध्ये उघडपणे ढवळाढवळ करीत असून कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप न.प. उपाध्यक्ष तथा गटनेता अशोक भैया यांनी मुख्याधिकारी प्रमोद वानखेडे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केला आहे. निवेदनाच्या प्रति पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना पाठविलेल्या आहेत.ब्रह्मपुरी नगरपालिकेचे उपाध्यक्ष अशोक भैया यांनी नगराध्यक्षांच्या पतीच्या घटनाबाह्य हस्तक्षेपामुळे सावळागोंधळ माजला असून विरोधी पक्षाच्या प्रभागातील विकासकामाकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका सत्तारूढ पक्षावर ठेवला आहे. प्रभाग क्र. ३, ४ व ५ मध्ये २०१४-१५ आणि कोणतीही विकासाची कामे प्रस्तावित केली नाही. प्रभाग क्र. ३ सर्वाधिक महसूल देणारा प्रभाग असूनही या प्रभागामध्ये शासन निधी अंतर्गत कोणतेही काम घेण्यात आले नाही. तीन बोअरवेल्सची मंजुरी असतानाही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. प्रभाग क्र. ४ मध्ये विकास शुल्क निधी अंतर्गत फुटकळ कामे अंदाजपत्रकानुसार होत नसून याबाबत चौकशीची मागणी भैया यांनी केली आहे. न.प. २०१४-२०१५ मध्ये दगडी नाल्या तोडून त्या ठिकाणी नवीन नाल्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदाराने दगडाची परस्पर विल्हेवाट लावली. संबंधित कंत्राटदाराकडून दगडाची किंमत वसूल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रभाग क्र. ४ मध्ये झालेल्या पाईपनालीचे काम निकृष्ठ दर्जाचे आहे. सावरकर चौक ते वासनिक यांच्या दुकानापर्यंत सुरू असलेल्या आर.सी.सी. नालीच्या कामात पिण्याच्या पाण्याची लाईन तोडण्यात आली. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. प्रभाग क्र. ४ मधील उद्यान, प्रभाग ३ मधील उद्यान आणि वाचनालय तसेच तहसील कार्यालयाच्या परिसरातील सुलभ शौचालयाचे काम पूर्ण होऊनही लोकार्पण न झाल्यामुळे नागरिकांना नागरी सुविधांचा लाभ घेता येत नाही. प्रभाग ३, ४ आणि ५ मधील बुजलेल्या बोअरवेल्सची दुरूस्ती करण्याची मागणी करूनही प्रशासन उदासीन आहे. वारंवार तक्रारी करूनही न.प. प्रशासन गंभीर नसल्याचा प्रत्यय नित्य दिसून येत आहे, असेही अशोक भैया यांनी म्हटले आहे.(तालुका प्रतिनिधी) राजकीय नैराश्येमधून आरोप - दीपक उराडेब्रह्मपुरी न.प. चे उपाध्यक्ष अशोक भैय्या यांनी पत्रकाद्वारे केलेले आरोप हे राजकीय नैराश्येपोटी केलेले आहे. त्यांनी केलेल्या आरोपामध्ये नगराध्यक्षाच्या पतीचा प्रशासनामध्ये हस्तक्षेप असल्याचा म्हटले आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, प्रशासनामधील कोणत्याही कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची प्रशासनामध्ये हस्तक्षेपाबाबतची तक्रार वरिष्ठाकडे किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडे केलेली नाही. त्यामुळे हे सर्व आरोप राजकीय नैराश्येमधून केल्याचे दीपक उराडे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
नगरपालिका प्रशासनामध्ये नगराध्यक्षांच्या पतीची ढवळाढवळ
By admin | Updated: July 5, 2015 00:58 IST