लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगर क्षेत्र व जिल्हाभरात १७५ केंद्रांमधून कोरोना प्रतिबंधक लस देणे सुरू आहे. मात्र, मोहिमेच्या पहिल्या दिवसापासून तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मागणीनुसार कधीच पुरवठा झाला नाही. दोन दिवस झाले की केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की येत आहे. नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये आधीच्याच वयोगटाला लस मिळत नसताना केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील १६ लाख ४१ हजार ८२९ हजार पात्र नागरिकांना लस देणे आरोग्य विभागासाठी डोंगराएवढे आव्हान राहण्याची शक्यता आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्याही वाढली. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याने ४५ वर्षांवरील जास्त वयाच्या नागरिकांची संख्या मोठी झाली. त्यामुळे प्राधान्य गटातील सर्व नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणार आहे. १७५ लसीकरण केंद्रांमध्ये सुमारे दोन हजार जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक तसेच अंगणवाडी सेविका, आशा, स्वयंसेवकांचाही समावेश आहे.
मागणी लाखाची पण मिळतात हजार !जिल्ह्यात दररोज सरासरी लसीकरण तीन ते चार हजार आहे. परंतु, मागणीनुसार लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे दोन दिवसातच लस संपून जाते. दररोज १० हजार डोस मिळाले तरच लसीकरण आणखी वेगाने होऊ शकते. १ मेपासून १८ वर्षांवरील लसीकरण युद्धस्तरावर राबविण्याची चंद्रपूर मनपा व जिल्हा आरोग्य प्रशासनाची तयारी आहेत. परंतु, डोस किती मिळतात यावरच अवलंबून राहणार आहे.
दुसऱ्या डोससाठी गोंधळ उडणारजिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. दुसरा डोस १४ फेब्रुवारीपासून सुरू झाला. केंद्र सरकारने आता २८ दिवसांऐवजी सहा ते आठ आठवड्यानंतर दुसरा डोस घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे हजारो नागरिकांनाच दुसरा डोस पुढे गेला. त्यातच आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण घोषित झाल्याने केंद्रात गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
२ लाख ९५ हजार २३ जणांनी घेतली लसजिल्ह्यात २३ एप्रिलपर्यंत २ लाख ९५ हजार २३ जणांनी लस घेतली. ४५ पेक्षा जास्त वयाचे व सहव्याधी असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आरोग्य प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार डोस उपलब्ध मिळाले असते तर आतापर्यंत सुमारे चार लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. मात्र,आठवड्यातून दोन ते तीन दिवस सलग लसीकरण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी केंद्र बंद ठेवावे लागत आहे.