चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या नागरिक कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या प्रकृतीची काळजी घेत आहे. मात्र शहरातील काही प्रभागातील नाल्या तुंबल्याने डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मनपाने शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
बेरोजगार संस्थांना काम देण्याची मागणी
चंद्रपूर : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने बेरोजगार संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या संस्थांना कामच मिळत नसल्याने त्या अवसानात पडल्या असून बेरोजगार कामाची मागणी करीत आहे. विशेष म्हणजे, शासनाने या संस्थांना काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र, या संस्थांना अद्यापही पाहिजे तसे शासकीय कामच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे संस्थाचालक अडचणीत आहेत. यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन काम देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
मैदानी खेळाबाबत जनजागृती गरजेची
चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. मोबाइल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाइलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळाबाबत जनजागृती करण्याची मागणी होत आहे. शाळेतील शिक्षण ऑनलाइन झाल्याने पालकही मुलांना मोबाइल देत आहेत. मात्र क्लास झाल्यानंतर मुले गेम खेळत आहेत.
इंदिरानगर परिसरात सुविधांचा अभाव
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते व नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहेत. नाले न झाल्याने सांडपाणी तुुंबून राहते. रस्त्यावरील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाने या परिसरात सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. इंदिरानगर परिसरातील अनेक ठिकाणी झुडुपे तयार झाली आहेत. तेथे परिसरातील कुत्रे व डुकरे खेळत असतात. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
रोहयो कामांची संख्या वाढवावी
भद्रावती : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, कामांची संख्या कमी असल्याने अनेक जाॅबकार्डधारकांना कामे मिळत नाहीत. सध्या शेतीपासून पुरेसा रोजगार नाही. त्यामुळे रोहयो कामांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे.
ग्राम राजस्व अभियान सुरू करावे
चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण आता कमी होत असल्याने जिल्ह्यात ग्राम स्वराज्य अभियानाची गरज आहे. या अभियानामुळे नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळते. ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी शासनाने तहसील व पंचायत समितीकडून अभियान सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
कापूस उत्पादकांच्या समस्या सोडवा
राजुरा : तालुक्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, पावसामुळे पिके वाया गेली. बोंड अळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने सर्वेक्षण केले, पण मोबदला मिळाला नाही.