नागरिकांची उडाली तारांबळ : नाल्या-गटारे चोकअप, अनेक मुख्य मार्ग पाण्याखाली चंद्रपूर : गेल्या कित्येक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना गुरूवारी थोडासा दिलासा मिळाला. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तास झालेल्या या पावसाने चंद्रपूरकरांना झोडपून काढले. पाणी वाहून जाणाऱ्या नाल्या व गटारे चोकअप झाल्याने शहरातील अनेक मुख्य मार्गावर पाणी ओसंडून वाहत होते. या पाण्यातून वाहने काढताना नागरिक चांगलीच कसरत करताना दिसले. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्यापही अनेक भागात पावसाने हजेरी लावली नाही. चंद्रपूर जिल्ह्यालाही पावसाची प्रतीक्षा लागून होती. गुरूवारी सकाळपासूनच थोडे ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस येईलच, अशी कुणालाही आशा नव्हती. मात्र सायंकाळी चार वाजताच्या सुमारास चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सुमारे एक तास झाला. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. पाऊस येणार नाही म्हणून रेनकोट, छत्रीविना बाहेर पडणाऱ्या नागरिकांची अनेक दुकानांमध्ये पाऊस थांबण्यासाठी प्रतिक्षा सुरू होती. मात्र बराच वेळ होऊनही पाऊस न थांबल्याने अनेकांना ओलेचिंब व्हावे लागले. मोठा पाऊस आला तर चंद्रपुरातील नाल्या, गटारे चोकअप होण्याची स्थिती यावर्षी वेगळी नाही. गुरूवारी झालेल्या एक तासाच्या मुसळधार पावसाने पुन्हा दरवर्षीची स्थिती दिसून आली. तुकूम-ताडोबा मार्गाला नदीचे स्वरूप आले होते. तर आझाद बगीचाच्या चारही बाजुच्या रस्त्यावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. पाऊस थांबल्यानंतर काही तासात जनजीवन पूर्वपदावर आले. (स्थानिक प्रतिनिधी)मूल, जिवती, ब्रह्मपुरीतही पाऊस गुरूवारी मूल, जिवती, ब्रह्मपुरी येथेही पावसाने हजेरी लावली. मात्र उर्वरीत तालुक्यात कडक उन्ह होते. गुरूवारचा पाऊस काहीच ठिकाणी असून सर्वदूर पाऊस होण्याची जिल्हावासीयांना प्रतीक्षाच आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तर काही ठिकाणी पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या खोळंबल्या आहेत.
चंद्रपुरात मान्सून बरसला
By admin | Updated: June 24, 2016 01:31 IST